Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांना अटक? चालान कापल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गाडीसोबतचा फोटो व्हायरल
बिग बींनी पोस्ट केलेल्या या फोटोवर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. यावर अनेकांनी त्यांना हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला होता. सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करणार नाही का, असाही सवाल नेटकऱ्यांनी मुंबई पोलिसांना केला होता.
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे त्यांच्या दमदार अभिनयासोबतच शिस्तप्रिय व्यक्तीमत्त्वासाठी ओळखले जातात. बिग बींनी आजवर चुकूनही असं काही काम केलं नाही, ज्यामुळे त्यांना पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागे. मात्र जे आजपर्यंत झालं नाही ते आता होताना दिसतंय. हेल्मेट न घालता दुचाकीवर प्रवास केल्याने नुकताच ट्रॅफिक पोलिसांनी त्यांचा चालान कापला. यामुळे ते चर्चेत होते. आता चालान कापल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
असं आम्ही नाही तर स्वत: अमिताभ बच्चन म्हणत आहेत. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये ते मुंबई पोलिसांच्या गाडीजवळ मान खाली करून उभे असल्याचं दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘अरेस्टेड’ (अटकेत). बिग बींचा हाच फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्यांना खरंच अटक झाली का, असा सवाल नेटकरी करत आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. भूतनाथला कोणी अटक करू शकत नाही, असं एकाने लिहिलं. तर ‘डॉन को पकडना मुश्कील ही नहीं, नामुमकीन है’, असा बिग बींचा डायलॉग दुसऱ्या युजरने पोस्ट केला. अभिनेता आणि कॉमेडियन मनीष पॉलनेही या फोटोवर कमेंट केली आहे. ‘हाहाहा.. लव्ह यू सर’ असं त्याने म्हटलंय. तर संजय दत्तची पत्नी मान्यतानेही ‘हाहाहाहा’ असं लिहिलं आहे.
View this post on Instagram
मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या बिग बींनी रस्त्यावर एका अनोळखी दुचाकीस्वाराकडे मदत मागितली होती. त्या व्यक्तीच्या बाइकवर बसून ते सेटवर वेळेत पोहोचले. याचा फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये ते त्या व्यक्तीच्या बाइकच्या मागे बसलेले दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘या प्रवासासाठी धन्यवाद मित्रा. मी तुला ओळख नाही, पण तू मला सेटवर वेळेत पोहोचण्यास मदत केली. या ट्रॅफिक जॅममधून तू तुझं काम जलदगतीने केलंस. पिवळा टी-शर्ट, शॉर्ट्स आणि कॅपचा मालक, तुझे आभार!’
बिग बींनी पोस्ट केलेल्या या फोटोवर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. यावर अनेकांनी त्यांना हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला होता. सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करणार नाही का, असाही सवाल नेटकऱ्यांनी मुंबई पोलिसांना केला होता. त्यानंतर बिग बींना एक हजार रुपयांचा दंड भरावा लागला.