Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांचं नवीन गाणं प्रदर्शित; पंजाबी पार्टी साँगवर तुमचेही पाय थिरकतील!
'अज मैं मूड बणा लेया..', अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याला अवघ्या काही तासांत लाखो व्ह्यूज
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवीन वर्षात नवीन गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. ‘आज मै मूड बणा लेया’ असे या गाण्याचे बोल असून बॅचलर पार्टीसाठी हे पंजाबी गाणं परफेक्ट आहे. अमृता यांनी हे गाणं फक्त गायलंच नाही तर त्याच्या म्युझिक व्हिडीओमध्ये त्या गाण्यावर थिरकल्यासुद्धा आहेत. या व्हिडीओला अवघ्या चार तासांत अडीच लाखांहून अधिक व्ह्यूज आणि एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.
अमृता यांनी गुरुवारी या गाण्याचा टीझर प्रदर्शित केला होता. या टीझरलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अनोखी फॅशन सेन्स, गोड आवाज आणि राजकीय शेरेबाजीमुळे त्या नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांच्या आतापर्यंतच्या गाण्यांप्रमाणे हे नवीन गाणंसुद्धा हिट ठरणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
पहा व्हिडीओ
अमृता फडणवीस या बँकर आहेत. मात्र त्यांना गायनाची प्रचंड आवड आहे. याआधीही त्यांचे म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. अमृता यांच्या या नव्या गाण्याची निर्मिती टी-सीरिज या ब्रँडने केली आहे. या गाण्याचे बोल, अमृता यांचा डान्स यासोबतच म्युझिक व्हिडीओतील त्यांचा ड्रेसिंग सेन्स चाहत्यांना आवडला आहे.
मीत ब्रोज या जोडगोळीने या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. मीत ब्रोजची याआधीची बरीच गाणी सुपरहिट ठरली आहेत. छम छम, मै तेरा बॉयफ्रेंड, दिल गलती कर बैठा है, चिट्टिया कलाईयाँ यांसारखी गाणी त्यांनी संगीतबद्ध केली आहेत. या गाण्यांप्रमाणेच अमृता फडणवीस यांचं नवीन गाणंसुद्धा हिट ठरणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.