तू कर लेगा..; ‘लस्ट स्टोरीज 2’मधील इंटिमेट सीन्ससाठी अमृता सुभाषच्या पतीनेच मित्राला समजावलं
नेटफ्लिक्सवरील 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटात मराठमोळ्या अमृता सुभाषने भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिने काही इंटिमेट सीन्ससुद्धा केले आहेत. खऱ्या आयुष्यातील खास मित्र अभिनेता श्रीकांत यादवसोबत तिचे हे सीन्स होते. अशा वेळी पतीनेच मित्राची समजूत काढल्याचं अमृताने सांगितलं.
मुंबई : 14 डिसेंबर 2023 | नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘लस्ट स्टोरीज 2’ या अँथोलॉजी चित्रपटात चार विविध दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या चार कथा दाखवण्यात आल्या होत्या. त्यातील एका कथेचं दिग्दर्शन कोंकना सेन शर्माने केलं होतं. ज्यामध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषने भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमृता चित्रपटातील इंटिमेट सीन्सच्या शूटिंगबद्दल व्यक्त झाली. चित्रपटात अमृताने अभिनेता आणि खऱ्या आयुष्यातील तिचा खास मित्र श्रीकांत यादवसोबत काही इंटिमेट सीन्स शूट केले होते. त्याच्यासोबत हे सीन्स शूट करण्यासाठी आणि कम्फर्टेबल होण्यासाठी कोंकनाकडे काही वेळ मागितला होता, असा खुलासा अमृताने केला.
‘लस्ट स्टोरीज 2’मधील अमृताच्या कथेचं नाव ‘मिरर’ असं होतं. यामध्ये तिने मोलकरीणीची भूमिका साकारली आहे. घराची मालकीण जेव्हा बाहेर जाते, तेव्हा ती तिच्या पतीला मालकिणीच्या घरी बोलावते आणि त्यावेळी दोघांमध्ये इंटिमेट सीन्स शूट करण्यात आले. हे सीन्स शूट करताना फक्त मीच नाही तर श्रीकांतसुद्धा तितकाच चिंताग्रस्त होता, असं अमृताने सांगितलं. कारण चित्रपटात काम करण्याच्या खूप आधी बऱ्याच वर्षांपासून दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
View this post on Instagram
“मी जेव्हा स्क्रीप्ट वाचत होते, तेव्हा त्यात बरेच इंटिमेट सीन्स होते आणि मला अशा सीन्सची खूप भीती वाटते. त्यामुळे मी कोकोकडे (कोंकना) थोडा वेळ मागितला. श्रीकांत माझा खूप जुना मित्र असल्याने त्याच्यासोबत एक दिवस घालवण्याची विनंती मी तिच्याकडे केली. माझ्याइतकाच तोसुद्धा घाबरलेला होता. मी तुझ्यासोबत हे सीन्स करू शकणार नाही, असं थेट म्हणाला. माझा पतीसुद्धा श्रीकांतचा खूप चांगला मित्र आहे. अखेर माझ्या पतीने त्याला समजावलं की, तू कर लेगा, अच्छे से कर लेगा (तू करशील, चांगलं करशील)”, असं अमृताने सांगितलं.
श्रीकांतने ‘जलसा’मध्ये पोलिसाची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘फॅमिली मॅन’ आणि ‘किल्ला’मध्येही त्याने काम केलंय. ‘लस्ट स्टोरीज 2’मध्ये कोंकनाशिवाय सुजॉय घोष, आर. बाल्की आणि अमित शर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्याही कथा दाखवण्यात आल्या होत्या. ‘लस्ट स्टोरीज’चा पहिला भाग 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी चार कथा दिग्दर्शित केल्या होत्या. त्यात अनुराग कश्यप, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी आणि करण जोहर यांचा समावेश होता. स्त्रियांच्या कामुक भावनेबद्दलच्या विविथ कथा यात आधुनिक दृष्टीकोनातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आल्या होत्या.