भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नापूर्वीचे विधी देखील मोठ्या थाटत पार पडत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. लहान मुलाच्या लग्नात अंबानी कुटुंबियांनी कोणतीच कसर सोडली नाही. मुकेश अंबानी यांनी अनंत आणि राधिकाच्या लग्नाची खास तयारी केली असून परदेशी पाहुण्यांनाही आमंत्रित केलं आहे. एवढंच नाही तर त्यांच्यासाठी खास व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न मुंबईतील जियो वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांच्या लग्नात जगातील श्रीमंत उद्योजक आणि दिग्गज व्यक्ती उपस्थित राहाणार आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील लग्नाचं निमंत्रण आहे. लग्नाच्या सर्व जबाबदाऱ्या डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड सांभाळणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुकेश अंबानी यांचं पूर्ण कुटुंब Z प्लस सुरक्षेत असणार आहे. बीकेसीमध्ये 10 एनएसजी कमांडो आणि पोलीस अधिकारी, 200 आंतरराष्ट्रीय सुरक्षा रक्षक, 300 सिक्योरिटी मेंबर्स आणि 100 हून अधिक वाहतूक आणि मुंबई पोलीस कर्मचारी यांचा समावेश असलेल्या सुरक्षा दलात तैनात असेल. एवढंच नाहीतर, व्हीव्हीआयपी पाहुण्यांची ने-आण करण्यासाठी फाल्कन-2000 सह 100 प्रायव्हेट जेटची व्यवस्था करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनंत आणि राधिका फ्लॅश मॉबसोबत लग्नमंडपात एन्ट्री करतील. राधिका आणि अनंत 600 डान्सर्ससोबत डान्स करणार आहे. तर कोरियोग्राफर वैभवी मर्चंट आहे. तर लग्नाच्या कपड्यांबद्दल सांगायचं झालं तर, सगळे आऊटफिट्स सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्रा याने डिझाईन केले आहेत.
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नात विविध प्रकारचे पदार्थ असणार आहे. लग्नात 10 हून अधिक आंतरराष्ट्रीय शेफ 2500 पदार्थ तयार करणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंबानी कुटुंबात होणाऱ्या शाही लग्नाची चर्चा रंगली आहे.