आदित्य रॉय कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर अनन्या पांडेनं सोडलं मौन; म्हणाली ‘प्रेमाच्या बाबतीत..’
अनन्या आणि आदित्यने कधीच जाहीरपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली नव्हती. मात्र या दोघांना व्हेकेशन, पार्ट्या आणि विविध कार्यक्रमांमध्ये अनेकदा एकत्र पाहिलं गेलं होतं. अनंत अंबानीच्या लग्नाच्या काही दिवस आधीच या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जातंय.
अभिनेत्री अनन्या पांडे ही सर्वाधिक चर्चेत असलेल्या बॉलिवूड स्टारकिड्सपैकी एक आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. अनन्या तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबतचं तिचं नातं अनेकांनाच माहीत आहे. या दोघांनी जाहीरपणे कधी प्रेमाची कबुली दिली नव्हती. मात्र परदेशात व्हेकेशन, विविध पार्ट्या आणि कार्यक्रमांमध्ये या दोघांना एकत्र पाहिलं गेलं होतं. काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांचे मार्ग वेगळे झाल्याचं कळतंय. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनन्या तिच्या खासगी आयुष्याविषयी आणि करिअरविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
‘इंडिया टुडे’च्या माइंड रॉक्स या कार्यक्रमात अनन्याला विचारलं गेलं की बॉलिवूडची कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याने तिच्या करिअरवर त्याचा कसा परिणाम झाला? यावर उत्तर देताना ती म्हणाली, “मला माझ्या वडिलांवर अभिमान आहे. कारण ते एका डॉक्टरांच्या कुटुंबातील आहेत. तरीसुद्धा फिल्म इंडस्ट्रीत त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख बनवली. त्यांच्यामुळे या इंडस्ट्रीत माझे कनेक्शन तयार झाले. स्टारकिड असल्याने प्राधान्य नक्कीच मिळतं. पण त्यानंतर तुम्ही स्वत:ला कसं सिद्ध करता त्यावर सगळं काही अवलंबून आहे. ही इंडस्ट्री बाहेरून खूपच ग्लॅमरस दिसत असली तरी आत बराच संघर्ष आहे.”
यावेळी सोशल मीडिया आणि त्यावर होणाऱ्या ट्रोलिंगवरही अनन्याने मत मांडलं. “माझ्या मते सोशल मीडिया हा डान्सच्या व्हिडीओंसाठी चांगला आहे. पण तिने भांडू नका. तुम्ही तुमची मर्यादा ठरवली पाहिजे. मी पण माणूस आहे. जेव्हा एखादी वाईट कमेंट करते, तेव्हा मलासुद्धा वाईट वाटतं. मी ट्रोलर्सना हेच सांगू इच्छिते की तुम्ही इतके वाईट कमेंट्स करू नका. त्याचप्रमाणे मी इतर लोकांना सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या मनाचं ऐका, लोकांचं ऐकू नका.”
View this post on Instagram
मल्याळम सिनेसृष्टीतील कास्टिंग काऊचबद्दल हेमा कमिटीने दिलेल्या रिपोर्टवरही अनन्या पांडे स्पष्ट बोलली. “हेमा कमिटीसारखंच प्रत्येक इंडस्ट्रीत एक कमिटी स्थापित केली पाहिजे. इंडस्ट्रीत महिलांसोबत काय घडतंय, ते समोर येईल. पण मला असं वाटतं की हे फक्त फिल्म इंडस्ट्रीपुरतं मर्यादित नाही, तर हे प्रत्येक इंडस्ट्रीत होतंय”, असं ती म्हणाली.
यावेळी अनन्याला तिच्या लव्ह लाइफविषयीही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ती पुढे म्हणाली, “प्रेमाच्या बाबतीत मला रहस्यमयी राहायला आवडेल. कारण मला प्रेम करायला आवडतं. पण मी कोणत्याची डेटिंग साइटवर नाही. मला खऱ्या आयुष्यात लोकांना भेटायला आवडतं. मला माझ्या आयुष्यात एक प्रेमकहाणी हवी आहे. माझ्या पार्टनरने माझा आदर करावा, माझ्याशी प्रामाणिक राहावं अशी माझी इच्छा आहे. जर हे गुण नसले तर ब्रेकअप होणं स्वाभाविक आहे.”