अल्लू अर्जुनच्या अटकेवर पवन कल्याण यांनी सोडलं मौन; “माणुसकीचा अभाव..”
संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी आणि अल्लू अर्जुनच्या अटकेप्रकरणी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे संपूर्ण प्रकरण हाताळताना त्यात माणुसकीचा अभाव होता, असं मत त्यांनी मांडलंय.
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी हैदराबादच्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीत झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना ते ‘पुष्पा 2’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनच्या अटकेविषयीही व्यक्त झाले. “जी गोष्ट काठीने सोडवता आली असती, ती आता कुऱ्हाडीवर नेण्यात आली आहे”, असं ते म्हणाले. 4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’च्या प्रीमिअरदरम्यान संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून तिच्या नऊ वर्षांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी थिएटरमध्ये चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती. त्याच गर्दीत रेवती नावाच्या महिलेचा श्वास गुदमरून मृत्यू झाला होता. याप्रकरणी 13 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
“थिएटर कर्मचाऱ्यांनी अल्लू अर्जुनला आधीच माहिती द्यायला हवी होती”
पवन कल्याण यांनी फिल्म इंडस्ट्रीला पाठिंबा दिल्याबद्दल तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचं कौतुक केलं. रेवंत यांनी चित्रपटांचे बेनिफिट शोज सुलभ केले, तिकिटांच्या दरात वाढ करण्यास परवानगी दिली, ज्यामुळे ‘सालार’, ‘पुष्पा 2’ यांसारख्या चित्रपटांची कमाई चांगली झाली, असं त्यांनी नमूद केलं. अल्लू अर्जुनच्या अटकेबाबत ते पुढे म्हणाले, “पडद्यामागे नेमकं काय घडलं, याची संपूर्ण माहिती मला नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे आणि अशा परिस्थितीत मी पोलिसांना दोष देत नाही. ते सुरक्षिततेला प्राधान्य देतात. मात्र थिएटरच्या कर्मचाऱ्यांनी अल्लू अर्जुनला परिस्थितीची आधीच माहिती द्यायला हवी होती. तो आत बसल्यानंतरही त्याला ते सांगू शकले असते आणि तिथून घेऊन जाऊ शकले असते.”
“अल्लू अर्जुनच्या बाजूने कोणीतरी पीडितेच्या कुटुंबाला लवकर भेट द्यायला हवी होती”
वेळेवर योग्य ती कृती न केल्याबद्दल आणि घडलेल्या घटनेबद्दल सहानुभूती न दाखवल्याबद्दल पवन कल्याण यांनी निराशा व्यक्त केली. “अल्लू अर्जुनच्या बाजूने कोणीतरी पीडितेच्या कुटुंबाला लवकर भेट दिली असती तर बरं झालं असतं. रेवतीच्या मृत्यूने मलाही धक्का बसला आहे. हे प्रकरण ज्या प्रकारे हाताळलं गेलं त्यात माणुसकीचा अभाव होता. प्रत्येकाने रेवतीच्या घरी शोक व्यक्त करण्यासाठी, कुटुंबीयांना धीर देण्यासाठी गेलं पाहिजे होतं. पीडितेच्या कुटुंबापर्यंत त्वरित न पोहोचल्यामुळे लोक संतप्त झाले आहेत. सिनेमा हा सर्वांसोबत मिळून केलेला प्रयत्न असतो. त्यात फक्त अल्लू अर्जुनला दोषी ठरवणं योग्य नाही. या घटनेनंतर त्याला खूप दु:ख झालं आहे. परिस्थितीच्या प्रभावाखाली येऊन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी प्रतिसाद दिला आणि इतरही निर्णय घेतले गेले”, असं मत त्यांनी मांडलं.
चिरंजीवी यांचं दिलं उदाहरण
यावेळी त्यांनी काही जुनी उदाहरणंसुद्धा दिली. “चिरंजीवीसुद्धा चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी थिएटरला भेट देत असत. मात्र ते गर्दी टाळण्यासाठी स्वत: दुसऱ्या वेशात जायचे. भविष्यात सुरक्षितता आणि माणुसकी टिकून राहावी यासाठी फिल्म इंडस्ट्रीने या घटनेपासून धडा घेतला पाहिजे”, असं पवन कल्याण म्हणाले.