तेव्हापासून भाऊ माझ्याशी बोलत नाही..; अनिल कपूर-बोनी कपूर यांच्यात मोठा वाद
"चित्रपटातील कलाकारांच्या मुद्द्यावरून माझा भाऊ अजूनही माझ्याशी नीट बोलत नाहीये. लवकरच हा वाद मिटेल अशी मला आशा आहे. बघुयात, पुढे काय होतंय", असं ते म्हणाले. 'नो एण्ट्री 2' या चित्रपटाच्या शूटिंगला डिसेंबर महिन्यात सुरुवात होईल. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 20 वर्षांनंतर हा सीक्वेल प्रदर्शित होणार आहे.
‘नो एण्ट्री 2’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटासाठी अभिनेता वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ या कलाकारांना निश्चित करण्यात आलं आहे. 2005 मध्ये ‘नो एण्ट्री’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये सलमान खान, फरदीन खान आणि अनिल कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप गाजला होता. तेव्हापासून त्याच्या सीक्वेलची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. आता निर्मात्यांनी ‘नो एण्ट्री 2’ची घोषणा केली असून त्यातील कलाकारसुद्धा जाहीर केले आहेत. अनीस बाझमी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर करणार आहेत. मात्र याच चित्रपटावरून कपूर कुटुंबातील भावंडांमध्ये वाद झाला आहे. ‘नो एण्ट्री’च्या सीक्वेलमध्ये आपली भूमिकाच नाही, हे समजल्यावर अनिल कपूर यांनी नाराजी व्यक्त केली.
अनिल कपूर यांना ‘नो एण्ट्री’च्या सीक्वेलमध्ये काम करण्याची इच्छा होती. मात्र जेव्हा सीक्वेलच्या कलाकारांची नावं जाहीर झाली, तेव्हा त्यात त्यांचं नावंच नव्हतं. ही गोष्ट त्यांना बाहेरून समजली होती. त्यामुळे ते संतापले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी या वादाचा खुलासा केला आहे. ‘झूम’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी सांगितलं की सीक्वेलच्या कलाकारांची घोषणा झाल्यापासून भाऊ अनिल कपूर त्यांच्याशी बोलत नाहीये.
“भाऊ अनिल कपूरला नो एण्ट्रीच्या सीक्वेलविषयी आणि त्यातील कलाकारांविषयी मी काही सांगण्याआधीच तो माझ्यावर रागावला होता. कारण त्याला सांगण्याआधीच ऑनलाइन ही बातमी लीक झाली होती. ते लीक होणं दुर्दैवी होतं आणि त्यामुळेच आमच्यात वाद निर्माण झाले आहेत. त्याला नो एण्ट्रीच्या सीक्वेलमध्ये काम करायची खूप इच्छा होती, हे मला माहित आहे. पण त्यात त्याच्या भूमिकेसाठी जागाच नाही. मी हे का केलं आणि नेमकं काय झालं हे मला त्याला समजावून सांगायचं आहे,” असं बोनी कपूर म्हणाले.
‘नो एण्ट्री 2’साठी वेगळ्या कलाकारांची निवड का केली, हे सांगताना बोनी कपूर पुढे म्हणाले, “वरुण धवन आणि अर्जुन कपूर हे खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्यांची ही मैत्री चित्रपटाच्या कथेसाठी फार कामी येईल. दिलजीत दोसांझची सध्या खूप लोकप्रियता आहे. त्याची फॅन फॉलोइंग पाहून ही ऑफर देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला साजेसे कलाकार मला घ्यायचे होते. म्हणून मी या तीन कलाकारांची निवड केली.” या चित्रपटामुळे भाऊ अनिल कपूर यांच्यासोबतच्या नात्यात वितुष्ट आल्याचं त्यांनी सांगितलं.