ही लोकं अडाणी.. ‘ॲनिमल’वर टीका करणाऱ्यांना दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाचं उत्तर
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ॲनिमल या चित्रपटाने भारतात कमाईचा 500 कोटी रुपयांचा तर जगभरात 800 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. ॲनिमलनंतर संदीपचा 'स्पिरीट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये प्रभास मुख्य भूमिकेत आहे. त्याशिवाय अल्लू अर्जुनसोबतही तो एका चित्रपटात काम करणार आहे.
मुंबई : 20 डिसेंबर 2023 | संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटाबद्दल विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. नेटकऱ्यांनी चित्रपटातील काही सीन्सवर आक्षेप घेतला. या सीन्सवरून कलाकारांनाही प्रश्न करण्यात आले. मात्र ज्यांच्या चष्म्यातून हा चित्रपट साकारला गेला, त्यांचं यावर काय म्हणणं आहे, हे अद्याप समोर आलं नव्हतं. आता स्वत: दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने सर्व टीकांना उत्तर दिलं आहे आणि चित्रपटाबद्दल त्याची बाजू मांडली आहे. यावेळी त्याने काही चित्रपट समिक्षकांची नावंसुद्धा घेतली आणि ते जाणूनबुजून निशाणा साधत असल्याचा आरोप त्याने केला आहे. अनुपमा चोप्रा, सुचित्रा त्यागी आणि राजीव मसंद यांना चित्रपट समीक्षणाविषयी शून्य माहिती असल्याचं तो म्हणाला.
“माझ्याच चित्रपटावर टीका करून पैसे कमावतायत”
रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ॲनिमल हा चित्रपट प्रदर्शित होताच, त्यावर स्त्रीविरोधी असल्याची टीका झाली. रणबीरच्या काही सीन्सवरही तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला होता. रणबीर आणि तृप्ती डिमरीच्या सीन्सवरूनही समिक्षकांनी नकारात्मक टिप्पणी केली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या सर्व टीकांवर संदीप म्हणाला, “एक माणूस जर बाल्कनीमध्ये उभा राहून 50 जणांना हे सांगत असेल की ॲनिमल चित्रपट पाहू नका, पागल चित्रपट आहे. तर मी एकवेळ ते ऐकेन. कारण असं केल्याने त्याला काही पैसे मिळत नाहीत. पण ही लोकं युट्यूब चॅनलद्वारे पैसे कमावतात. माझ्या चित्रपटाबद्दल बोलून त्या लोकांना पैसा मिळतोय. म्हणजेच माझ्या चित्रपटावर टीका करून तुम्ही पैसा, प्रसिद्धी, नाव सगळं काही कमावताय. कबीर सिंग या चित्रपटाच्या वेळीही बऱ्याच समिक्षकांसोबत असंच झालं होतं. कबीर सिंगवर टीका करून त्यांनी प्रसिद्धी मिळवली होती.”
“चित्रपटापेक्षा चित्रपट दिग्दर्शकाबद्दल फार द्वेष”
काही चित्रपट समिक्षक हे ठराविक चित्रपट आणि दिग्दर्शकांचंच कौतुक करतात, पक्षपातीपणा करतात, असाही आरोप संदीपने या मुलाखतीत केला. याविषयी तो पुढे म्हणाला, “मला हे स्पष्ट दिसतंय की चित्रपटापेक्षा चित्रपट दिग्दर्शकाबद्दल फार द्वेष आहे. कबीर सिंगमुळे ॲनिमलच्या टीकेत वाढ झाली आणि आता ॲनिमलमुळे यापुढे प्रदर्शित होणाऱ्या प्रभासच्या ‘स्पिरीट’वरही ही लोकं टीका करतील. पण मला या गोष्टीने फरक पडत नाही. कारण लाखो लोकांना माझा चित्रपट आवडतोय.”
“हे समीक्षक चित्रपटाच्या बाबतीत अडाणी”
रणबीर आणि तृप्ती डिमरीच्या शूजच्या सीनवरही संदीपने प्रतिक्रिया दिली. “ते तर झालंच नाही. मग जे झालं नाही त्याबद्दल कशाला बोलताय? काही समिक्षक तर जाणूनबुजून निशाणा साधत आहेत. मी इतरही काही रिव्ह्यू पाहिले आहेत. ते ज्या पद्धतीने बोलतात, ते पाहून त्यांनी चीनमध्ये इंग्रजी शिकवायला जावं असं मला वाटतं. कारण प्रत्येक व्हिडीओ रिव्ह्यूमध्ये ते एखादा नवीन इंग्रजी शब्द घेऊन येतात. त्याशिवाय तुम्हाला वेगळं काहीच दिसत नाही. कबीर सिंग चित्रपटाच्या वेळीही फक्त कबीरने प्रीतीच्या कानाखाली मारली, यावरच लोकांनी लक्ष केंद्रीत केलं. पण त्यांनी याचा उल्लेख केला नाही की प्रीतीने सर्वांत आधी कबीरला मारलं होतं,” असं संदीप रेड्डी वांगा म्हणाला.
या मुलाखतीत काही चित्रपट समिक्षकांची नावं घेत संदीपने जाहीर नाराजी व्यक्त केली. “हा चित्रपट म्हणजे साडेतीन तासांचा टॉर्चर आहे, असं तुम्ही कसं म्हणू शकता? ही किती लज्जास्पद बाब आहे. असा चित्रपट समिक्षकांमुळेच कलेक्शनवरही परिणाम होतो. अनुपमा, सुचित्रा, राजीव हे चित्रपटांच्या बाबतीत अशिक्षित आहेत. कारण कोणीच एडिटिंग, क्राफ्ट, साऊंड डिझाइन याविषयी काही बोलत नाही. कारण चित्रपटाचा विषय येतो तेव्हा ते खरंच अशिक्षित आहेत. एखाद्या चित्रपटाचं समिक्षण कसं करावं हे खरंच त्यांना कळत नाही”, अशी परखड टिप्पणी त्याने केली.