मुंबई : 8 डिसेंबर 2023 | सोशल मीडियावर सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे ‘ॲनिमल’. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातील सीन्स, गाणी, डायलॉग्स चर्चेचा विषय ठरले आहेत. हा चित्रपट काहींना आवडला तर काहींना त्यातील बऱ्याच गोष्टी खटकल्या आहेत. मात्र हाच चित्रपट एका अभिनेत्रीसाठी खूप खास ठरतोय. या अभिनेत्रीचं नाव आहे तृप्ती डिमरी. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर तिचं नाव सतत चर्चेत आहे. ‘ॲनिमल’मध्ये तिने झोयाची भूमिका साकारली असून चित्रपटात रणबीरसोबत तिचे काही न्यूड आणि इंटिमेट सीन्स आहेत. तृप्तीला नेटकऱ्यांनी ‘नॅशनल क्रश’चा किताब दिला आहे. 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानंतर तृप्तीचं आयुष्यच बदललं आहे. कारण गेल्या सहा ते सात दिवसांत तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये तब्बल 320 टक्क्यांची वाढ झाली आहे.
तृप्ती डिमरीचे इन्स्टाग्रामवर सध्या 27 लाख फॉलोअर्स आहेत. गेल्या महिन्यात तिचे फक्त सहा लाख फॉलोअर्स होते. सहा लाखांवरून तिने थेट 27 लाखांवर झेप घेतली आहे. फॉलोअर्सचा हा आकडा जलद गतीने वाढताना दिसतोय. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेटकरी खूप उत्सुक आहेत. तृप्तीने 2017 मध्ये ‘पोस्टर बॉईज’ या कॉमेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लैला मजनू’ या चित्रपटात तिने पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली. अन्विता दत्त यांच्या ‘बुलबुल’ (2020) आणि कला (2022) या दोन चित्रपटांमुळे तिला विशेष प्रसिद्धी मिळाली.
‘ॲनिमल’ या चित्रपटातील सीन्सवरून तृप्तीवर टीकासुद्धा झाली. याविषयी ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली. “ॲनिमलमधील माझ्या सीनवर बरीच टीकासुद्धा होत आहे आणि सुरुवातीला त्या टीकेमुळे मी विचलीत झाले होते. कारण सुरुवातीच्या चित्रपटांसाठी माझ्यावर कधीच टीका झाली नव्हती. यावेळी दोन्ही बाजू पहायला मिळत आहेत. पण जोपर्यंत मी कम्फर्टेबल आहे, जोपर्यंत सेटवरील माझ्या आजूबाजूचे लोक मला कम्फर्टेबल होऊ देत आहेत, जोपर्यंत मला असं वाटतंय की मी जे करतेय ते योग्य आहे तोपर्यंत मी ते करत राहणार. कारण एक अभिनेत्री आणि एक व्यक्ती म्हणून मला काही गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे”, असं ती म्हणाली.