अंकिताच्या आईने घेतली विकी जैनची शाळा; म्हणाल्या “तुला समजत नाहीये..”
बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळतोय. नुकतीच घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या आईने घरात एण्ट्री केली. यावेळी अंकिताच्या आईने जावयाची चांगलीच शाळा घेतली. बिग बॉसच्या घरात दोघांमध्ये होणाऱ्या सततच्या भांडणांवरून त्यांनी अंकितालाही समजावलं.
मुंबई : 9 जानेवारी 2024 | कुटुंबीयांपासून दूर ‘बिग बॉस’च्या घरात जवळपास 86 दिवस राहिल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने जेव्हा तिच्या आईला पाहिलं, तेव्हा ती ढसाढसा रडू लागली. आई वंदना लोखंडे यांना भेटून ती अत्यंत भावूक झाली. ‘बिग बॉस 17’मध्ये सध्या फॅमिली वीक सुरू आहे. घरातील स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची संधी दिली जात आहे. पहिल्याच दिवशी घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची आई आली. अंकिताच्या आईने घरातील इतर स्पर्धकांचीही भेट घेतली आणि त्यानंतर त्या अंकिता-विकीला घेऊन घराच्या एका बाजूला गेल्या. याठिकाणी त्यांनी दोघांना एकत्र बसवलं आणि त्यांची समजूत घातली.
बिग बॉसच्या घरात अंकिता आणि विकीला सतत भांडताना पाहिलं गेलं आहे. या भांडणांवरून वंदना लोखंडे यांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. “तुम्ही दोघं एकमेकांसोबत खऱ्या आयुष्यात जसे आहात, तसे मला या शोमध्ये दिसत नाही. तुम्हाला नेमकं काय होतंय? विकी तू सुद्धा ही गोष्ट समजू शकत नाहीयेस”, असं त्या म्हणतात. त्यावर अंकिता आईला विचारते, “म्हणजे आम्ही खूप भांडताना दिसतोय का?” याचं उत्तर देताना तिची आई पुढे सांगते, “खूप अती होतंय.” आईचं हे बोलणं ऐकल्यानंतर अंकिता चिंतेत येते. विकीची आई आणि सासूकडून ओरडा बसेल की काय, असं तिला वाटतं.
View this post on Instagram
यानंतर विकी जैनची आईसुद्धा अंकिताची भेट घेते. यावेळी विकीची आई त्या घटनेचा उल्लेख करते, जेव्हा अंकिता विकीला लाथ मारते. त्या म्हणतात, “ज्या दिवशी तू त्याला लाथ मारली होती, त्याच दिवशी मी तुझ्या मम्मीला कॉल केला आणि विचारलं की तुम्हीसुद्धा तुमच्या पतीला अशा पद्धतीने लाथ मारायचे का?” हे ऐकून अंकिताचा राग अनावर होतो. ती म्हणते, “मम्मीला फोन करायची काय गरज होती?” यावर विकीची आई म्हणते, “म्हणजे तू विचार कर की मला किती वाईट वाटलं असेल.” यानंतर अंकिता तिच्या सासूंना विनंती करते, “माझ्या वडिलांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालंय मम्मी. तुम्ही माझ्या आईवडिलांबद्दल काही बोलू नका प्लीज.”