विकी जैनला घटस्फोट देण्याविषयी अंकिता म्हणाली, “आमची भांडणं टीव्हीवर..”
'बिग बॉस 17' हा शो 28 जानेवारी रोजी संपला. यामध्ये अंकिता थर्ड रनर अप राहिली. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने बिग बॉसची ट्रॉफी आणि 50 लाख रुपये आपल्या नावावर केले. या शोमध्ये अंकिता आणि तिचा पती विकी जैन यांच्यात खूप भांडणं झाली.
मुंबई : 8 फेब्रुवारी 2024 | ‘बिग बॉस’चा सतरावा सिझन संपला आहे, मात्र या सिझनमध्ये झालेली भांडणं अजूनही चर्चेत आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यातील भांडणं संपूर्ण सिझनमध्ये पहायला मिळाली. इतकंच नव्हे तर शो संपल्यानंतर दोघं एकमेकांना घटस्फोट देणार की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. बिग बॉसच्या घरात विकीसोबतच्या भांडणादरम्यान स्वत: अंकिताने एक-दोन वेळा घटस्फोट देण्याचा उल्लेख केला होता. आता शो संपल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत अंकिताने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विकीसोबतचं नातं आणि बिग बॉसच्या घरातील वातावरण यांविषयी ती मोकळेपणे व्यक्त झाली.
पती विकीला घटस्फोट देणार का?
‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत अंकिता म्हणाली, “काही वर्षांच्या मैत्रीनंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला होता. आम्ही बिग बॉसच्या घरात घटस्फोटाबद्दल फक्त बोलायचो, पण लोकांनी ते गांभीर्याने घेतलं. मी समजुतदार नाही आणि जेव्हा मी कॅमेरासमोर असते, तेव्हा मला अधिक समजुतदार होण्याची गरज असते. मी जे काही बोलते, त्याविषयी मला संवेदनशील असायला हवं. या सर्वांमधून मी शिकत जातेय. जर आमचं नातं मजबूत नसतं, तर आम्ही कदाचित भांडलोही नसतो.”
View this post on Instagram
याविषयी अंकिता पुढे म्हणाली, “फरक फक्त इतकाच आहे की आमची भांडणं नॅशनल टीव्हीवर झाली. हे सर्वसामान्य जोडप्यांबद्दल घडत नाही. पण या सर्व प्रवासात आमचं नातं आणखी मजबूत झालं आहे. मी कुठे चुकतेय हे मला कळत गेलं आणि विकीलाही त्याच्या चुकांची जाणीव झाली. आता आमचं नातं पहिल्यापेक्षा अधिक मजबूत झालं आहे.”
‘बिग बॉस 17’मुळे मानसिक स्वास्थ्यावर परिणाम
या मुलाखतीत अंकिताने असंही स्पष्ट केलं की बिग बॉस या शोचा तिच्या मानसिक स्वास्थ्यावर खूप परिणाम झाला. “मला असं वाटतं की मला बिग बॉसच्या धक्क्यातून सावरलं पाहिजे, कारण त्या शोचा माझ्या मानसिक स्वास्थ्यावर खूप परिणाम झाला आहे. मी कधीच ओव्हरथिंकर (अतीविचार करणारी) नव्हती. पण तिथे परिस्थिती अशी होती की मी तशी बनले. मला त्यातून बाहेर पडायचं आहे. माझ्या आयुष्यात जे काही घडलं, त्या सर्व गोष्टींना मी समजण्याचा प्रयत्न करतेय. यात वेळ लागेल, पण नक्कीच मी त्यातून बाहेर येईन”, असं तिने स्पष्ट केलं.