त्याच्या डोक्यावर बसून नाचा तरी..; पती विकी जैनला घटस्फोट देण्याबद्दल असं का म्हणाली अंकिता लोखंडे?
अभिनेत्री अंकिता लोखंडे 'बिग बॉस 17'च्या घरात प्रचंड चर्चेत होती. पती विकीसोबतच्या सततच्या भांडणांमुळे तिला ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता विकीला घटस्फोट देणार असल्याच्या चर्चांवर मोकळेपणे व्यक्त झाली.
मुंबई: 11 मार्च 2024 | ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘बिग बॉस 17’मधील तिच्या वागणुकीमुळे खूप चर्चेत राहिली. बिग बॉसच्या घरात पती विकी जैनसोबत सतत तिची भांडणं पहायला मिळाली. तर सासरच्या मंडळींकडूनही अंकिताला कशाप्रकारची वागणूक मिळते, हे शोमध्ये पहायला मिळालं. अंकिताने या शोदरम्यान अनेकदा पूर्व प्रियकर आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं नाव घेतलं. तिने केवळ सहानुभूतीसाठी सतत सुशांतचं नाव घेतलं असे आरोप चाहत्यांकडून आणि तिच्या सासकडूनही झाले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता या सर्व गोष्टींविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
‘झूम’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अंकिता म्हणाली, “मला असं वाटतं की हे माझं आयुष्य आहे. जर मला एखादी व्यक्ती माहीत असेल, त्या व्यक्तीविषयी मला काही चांगली माहिती असेल तर त्याबद्दल मी नक्कीच बोलेन. कोणीच मला थांबवू शकत नाही. याव्यतिरिक्त जर तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर ती तुमची मतं आहेत. त्यावर मी काहीच बोलू शकत नाही.” बिग बॉसच्या घरात पती विकी जैनसोबत होत असलेल्या सततच्या वादामुळे दोघांच्या घटस्फोटाच्याही चर्चांना उधाण आलं होतं. खुद्द अंकिताने घटस्फोटाचा उल्लेख केला होता. घरातून बाहेर पडल्यानंतर तिने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
“मला असं वाटतं की तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता, त्यावर तुम्ही प्रेम करत राहीलं पाहिजे. त्याच्या डोक्यावर बसून जरी नाचलात तरी काही फरक पडत नाही. कारण जर तो तुमच्यावर प्रेम करत असेल, तर तो तुमच्यासोबत कोणत्याही परिस्थितीत राहील. तो दुसरीकडे कुठेच जाणार नाही”, असं अंकिता विकीबद्दल म्हणाली. बिग बॉसच्या सतराव्या सिझनमध्ये अंकिता चौथ्या स्थानी बाद झाली होती. घरातील तिचा प्रवास हा सर्वांत कठीण असल्याची भावना सूत्रसंचालक सलमान खाननेही व्यक्त केली होती.
‘बिग बॉस 17’च्या ग्रँड फिनालेच्या आधीच्या आठवड्यात विकी घराबाहेर पडला होता. शोमधून बाहेर येताच त्याने मैत्रिणींसोबत पार्टी केली होती. तर ग्रँड फिनालेमध्ये अंकिता चौथ्या स्थानी बाद झाली होती. बिग बॉसचा विजेता स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ठरला. त्याला ट्रॉफी, 50 लाख रुपये आणि ह्युंडाई क्रेटा कार बक्षीस म्हणून मिळाली.