अंकिता लोखंडे-विकी जैनवर आली कपल काऊन्सलिंगची वेळ; वैवाहिक आयुष्यात समस्या?
'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अंकिता आणि विकी जैन यांच्यात सतत होणारी भांडणं ही चाहत्यांसाठी काही नवीन नाहीत. परंतु आता हे दोघं कपल काऊन्सलिंगपर्यंत पोहोचले आहेत.

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन अनेकदा त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांमुळे चर्चेत येतात. हे दोघं ‘बिग बॉस’ या शोमध्ये एकत्र सहभागी झाले, तेव्हासुद्धा त्यांच्यात सतत भांडणं झाल्याची पहायला मिळाली. इतकंच नव्हे तर अंकिता आणि तिच्या सासूचंही विशेष पटत नसल्याचं यातून समोर आलं होतं. ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतर आता पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आली आहे. नुकतीच अंकिता तिची आई वंदना लोखंडे आणि पती विकी जैनसोबत इंदूर इथल्या तिच्या बालपणीच्या घरी गेली होती. यावेळी अंकिताने विकीला कपल काऊन्सलिंगचा सल्ला दिला, मात्र विकीने तो एका क्षणात नाकारला.
अंकिता यावेळी तिच्या चुलत बहिणीला भेटली. अंकिताची चुलत बहीण काऊन्सलर (समुपदेशक) आहे. त्यामुळे तिच्याकडे कपल काऊन्सलिंग करायचा विचार अंकिताच्या मनात आला. ती लगेचच विकीला म्हणाली, “बेबी, आपल्याला एक काऊन्सलर भेटली आहे. निती दी आपलं काऊन्सलिंग करू शकेल. ती आपलं कपल काऊन्सलिंग करेल.” हे ऐकताच विकी अंकिताला स्पष्ट सांगतो की त्याला काऊन्सलिंगची गरज नाही. “आपल्याला नाही, फक्त तुला काऊन्सलिंगची गरज आहे”, असं विकी म्हणतो. त्यावर अंकिताला त्याला म्हणते, “हीच समस्या आहे. विकीला असं वाटतं की तो परफेक्ट आहे. पण असं नाहीये विकी.” तेव्हा विकी तिला उत्तर देतो, “मी परफेक्ट नाही पण माझं डोकं ठीक आहे.”




View this post on Instagram
विकीचं हे उत्तर ऐकून अंकिता चांगलीच वैतागते. “माझ्या मते माझं डोकं तुझ्यापेक्षा जास्त ठीक आहे. म्हणूनच मीतुला सहन करू शकतेय. जाऊ दे.. आता भांडण होईल”, असं म्हणत ती हा संवाद तिथेच थांबवते. वैवाहिक आयुष्यात विविध समस्या जाणवल्यास किंवा एकमेकांसोबत संवाद व्यवस्थित होत नसेल किंवा इतर काही समस्या असतील तेव्हाही अनेक जोडपं ‘कपल काऊन्सलिंग’चा पर्याय निवडतात. परंतु थेरपीबाबत अनेक जोडप्यांमध्ये मतभेद असतात. नकार किंवा फक्त एकाच व्यक्तीची चूक आहे असा समज असल्यामुळे काहीजण काऊन्सलिंगला नकार देतात.