बिग बॉसनंतर अंकिता लोखंडेकडून डॅमेज कंट्रोल सुरू; सासूसोबत मंदिरातील व्हिडीओ पाहून कमेंट्सचा वर्षाव
अभिनेत्री अंकिता लोखंडेनं सोशल मीडियावर सासूसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सासूसोबत जैन मंदिरात जाऊन पूजा करताना दिसतेय. यावरून नेटकरी अंकिताला ट्रोल करत आहेत. हा दिखावा कशासाठी, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.
‘बिग बॉस 17’च्या घरात आणि घराबाहेर सर्वाधिक चर्चा ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन या दोघांचीच झाली होती. बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर अंकिता आणि विकी यांच्यात सतत भांडणं होत होती. दुसरीकडे अंकिताची सासू रंजना जैन यासुद्धा तिच्याविरोधात बोलताना आणि वागताना दिसल्या होत्या. अंकिताचं तिच्या सासूशी पटत नाही, हे बिग बॉसमध्ये पहायला मिळाल्यानंतर आता तिच्याकडून ‘डॅमेज कंट्रोल’ केलं जातंय, असं नेटकरी म्हणतायत. नुकताच अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या सासूसोबत जैन मंदिरात गेल्याचं दिसतंय. मात्र तिचा हा व्हिडीओ म्हणजे फक्त दिखावा असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये तिला ट्रोलसुद्धा केलंय.
अंकिताची पोस्ट-
‘माझ्या मम्मासोबत (सासू) वेळ घालवणं हा खरोखरंच समृद्ध करणारा अनुभव होता. मंदिराच्या या भेटीदरम्यान व्यतीत केलेल्या क्षणांमुळे आमचं नातं अधिक घट्ट झालं आहे. एकत्र मंदिरात गेल्याने आपल्याला व्यस्त जीवनात चिंतन, प्रार्थना आणि शांतता शोधण्याची संधी मिळते. ही एक विशेष वेळ असते जिथे आपण केवळ अध्यात्मिक समाधान शोधत नाही तर अर्थपूर्ण संभाषण आणि परस्पर संबंध मजबूत करतो. मंदिरातील प्रत्येक भेटीमुळे आपल्या मनात शांततेची भावना निर्माण होते आणि कुटुंबाला एकत्र बांधणाऱ्या या मूल्यांप्रती आणि परंपरांप्रती कृतज्ञतेची भावना निर्माण होते. या क्षणांनी परस्पर आदर आणि प्रेमाची भावना वाढवील आहे. ज्यामुळे आमचं नातं आणखी खास बनलंय,’ असं कॅप्शन देत अंकिताने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये अंकिता तिच्या सासूसोबत जैन मंदिरात दर्शनासाठी जाते. मंदिरात बसून ती जप करतानाही दिसते. मात्र तिच्या या व्हिडीओवरून अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ‘मंदिरात प्रार्थनेसाठी गेल्यानंतर दिखाव्याची काय गरज आहे’, असा सवाल एकाने विचारला. तर किमान मंदिरात तरी व्हिडीओग्राफी बंद ठेवावी, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘सासूसोबत तुझं कसं नातं आहे, हे आम्ही बिग बॉसमध्ये पाहिलंय’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.