‘हमारे बारह’च्या टीमला एकनाथ शिंदेंकडून आश्वासन; अनु कपूर यांच्याकडून सुरक्षेची मागणी
‘हमारे बारह’ या चित्रपटाचं दिग्दर्शन कमल चंद्रा यांनी केलं असून राजन अगरवाल यांनी कथा लिहिली आहे. याआधी या चित्रपटाचं नाव ‘हम दो हमारे बारह’ असं ठेवण्यात आलं होतं. मात्र नंतर सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाचं नाव बदललं. या चित्रपटात अश्विनी काळसेकर, राहुल बग्गा, अदिती भटपहरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
कमल चंद्रा दिग्दर्शित ‘हमारे बारह’ या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाचा विषय आणि टीझरमध्ये दाखवण्यात आलेला बोल्ड कंटेट यांमुळे अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात महिलांच्या त्रासाबद्दल भाष्य करतानाच ठराविक समुदायाविरोधात द्वेष पसरवला जातोय, असाही आरोप काहींनी केला आहे. हा चित्रपट प्रदर्शित करण्याविरोधात त्यातील कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यामध्ये भूमिका साकारणारे अभिनेते अनु कपूर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आपली बाजू मांडली होती. आधी चित्रपट बघा, मग निर्णय घ्या, असं आवाहन त्यांनी केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
याविषयी अनु कपूर म्हणाले, “हमारे बारह हा चित्रपट येत्या 7 जूनला प्रदर्शित होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण सुरक्षेचं आश्वासन दिलं आहे. कोणतीही काळजी न करता चित्रपट प्रदर्शित करावा, असं ते म्हणाले. चित्रपटाचं पोस्टर ही फक्त एक झलक असते. प्रमोशनसाठी ते वापरलं जातं. पण त्यावरून चित्रपटाच्या टीमला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षेची विनंती केली आहे. आमच्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिली आहे. धमक्यांप्रकरणी चौकशी होईल आणि आरोपींवर कारवाई करण्याचंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.”
याआधी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनु कपूर यांनी चित्रपटाविषयी त्यांचं मत मांडलं होतं. “माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर मी नास्तिक आहे. माझ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना असं वाटलं की चित्रपटातील भूमिकेसाठी मी योग्य कलाकार ठरू शकेन. त्यामुळे मी माझ्या भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. याव्यतिरिक्त मला कोणत्याच गोष्टीने फरक पडत नाही. चित्रपटांचं विश्व काल्पनिक असतं आणि त्यात मी फक्त एक कलाकार आहे. मी धार्मिक व्यक्ती नाही. धर्म आणि राजकारण या गोष्टींशी माझं काहीच घेणं देणं नाही. मला या चित्रपटासाठी चांगले पैसे मिळाले, म्हणून मी तो स्वीकारला. मी पैशांसाठी काम करतो. पण पैशांसाठी मी कधीच कोणाचा खिसा कापणार नाही, चोरी करणार नाही, गळा कापणार नाही किंवा माझ्या देशाला विकणार नाही.”
‘हमारे बारह’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात अनु कपूर, मनोज जोशी आणि पारितोष त्रिपाठी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या टीझरमध्ये महिलांच्या वेदनांचं धाडसी कथन केल्याचं पहायला मिळालं. यामध्ये वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा मांडण्यात आला असून त्यामुळे महिलांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं, हे दाखवण्यात आलं होतं. मात्र हाच टीझर काहींना खटकला असून चित्रपटाच्या कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.