‘हमारे बारह’ चित्रपटावरून का होतोय वाद? अनु कपूर यांच्याकडून पोलीस संरक्षणाची मागणी
'हमारे बारह' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून त्यावरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाला अनेकांनी विरोध केला असून आता कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याप्रकरणी अभिनेते अनु कपूर यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
कमल चंद्रा दिग्दर्शित ‘हमारे बारह’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात अनु कपूर, मनोज जोशी आणि पारितोष त्रिपाठी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या संकल्पनेवरून वाद निर्माण झाला असून त्यावरून कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. चित्रपटाच्या टीझरमध्ये महिलांच्या वेदनांचं धाडसी कथन केल्याचं पहायला मिळालं. यामध्ये वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा मांडण्यात आला असून त्यामुळे महिलांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं, हे दाखवण्यात आलं होतं. मात्र हाच टीझर काहींना खटकला असून चित्रपटाच्या कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अभिनेते अनु कपूर यांनी याप्रकरणी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
अनु कपूर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये ते म्हणाले, “या चित्रपटात महिला सक्षमीकरणाचा मुद्दा मांडण्यात आला असून महिलांच्या हक्कांबद्दल त्यात भाष्य करण्यात आलं आहे. आधी चित्रपट बघा आणि मग निर्णय घ्या. सोशल मीडियावर लोकांना आपल्या मनातलं बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, पण त्यांनी गैरवर्तन करू नये. कोणालाही शिवीगाळ करू नका किंवा जीवे मारण्याच्या धमक्या देऊ नका. आम्ही या गोष्टींना घाबरणार नाही. आम्ही फक्त महिला सक्षमीकरणावर बोलण्यासाठी हा चित्रपट बनवला आहे. त्यात वाढत्या लोकसंख्येच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे. यात कोणत्याही जाती किंवा समुदायाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही.”
पहा टीझर-
‘हमारे बारह’ या चित्रपटाचं दिग्दर्शन कमल चंद्रा यांनी केलं असून राजन अगरवाल यांनी कथा लिहिली आहे. याआधी या चित्रपटाचं नाव ‘हम दो हमारे बारह’ असं ठेवण्यात आलं होतं. मात्र नंतर सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाचं नाव बदललं. या चित्रपटात अश्विनी काळसेकर, राहुल बग्गा, अदिती भटपहरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. एका ठराविक समाजाला बदनाम करण्यासाठी हा चित्रपट बनवला असल्याचं त्यांनी म्हटलंय. याविषयी ते पत्रकार परिषदेत म्हणाले, “जी कोणी व्यक्ती मला एका मुस्लीम व्यक्तीच्या घरात त्याची 10 मुलं दाखवेल, त्याला मी 11 लाख रुपयांचं बक्षीस देईन. आता कुठल्याही मुस्लीम व्यक्तीला 10 किंवा त्यापेक्षा अधिक मुलं नाहीत. असं चित्र कुठेही नसताना लोकांमध्ये गैरसमज का निर्माण केला जातोय? कोणी किती मुलं जन्माला घालावी हा त्या पती-पत्नीचा प्रश्न आहे. एखाद्या महिलेला अधिक मुलं नको असतील तर ती नकार देऊ शकते.”