‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्येच का सोडली? अंशुमन विचारेनं अखेर सोडलं मौन

| Updated on: Jan 10, 2024 | 1:49 PM

कोरोना काळात अंशुमन विचारेनं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा लोकप्रिय शो सोडला होता. या शोमधून अचानक निरोप घेण्यामागचं कारण आता अंशुमनने सांगितलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्येच का सोडली? अंशुमन विचारेनं अखेर सोडलं मौन
Anshuman Vichare
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 10 जानेवारी 2024 | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय मालिकेचा निरोप घेण्याविषयी अभिनेता अंशुमन विचारेनं अखेर मौन सोडलं आहे. सतत एकाच धाटणीचं काम करून मानसिक थकवा आल्याचं कारण त्याने सांगितलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला गेल्या काही वर्षांत प्रचंड लोकप्रियता मिळाली. यामधील ओंकार भोजने, विशाखा सुभेदार आणि अंशुमन विचारे यांसारख्या कलाकारांना चांगली प्रसिद्धी मिळाली. मात्र अंशुमनने हा कार्यक्रम मध्येच सोडला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो या कॉमेडी शोमधून एग्झिट घेण्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अंशुमन म्हणाला, “2019 मध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. तो कोविडचा काळ होता. त्यामुळे आम्ही बायो-बबलमध्ये शूटिंग करत होतो. त्यावेळी माझी मुलगी फक्त एक ते दोन वर्षांची होती. प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर त्यावेळी मी मानसिकदृष्ट्या खूप थकलो होतो. माझ्या मते जेव्हा एखादी गोष्ट ठराविक उंचीला किंवा मर्यादेला पोहोचते, तेव्हा ब्रेक घेणं खूप गरजेचं असतं.”

हे सुद्धा वाचा

एक अभिनेता म्हणून विविध कल्पक कामांमध्ये प्रयोग करायला आवडत असल्याचंही अंशुमने यावेळी सांगितलं. तो पुढे म्हणाला, “मला नेहमीच क्रिएटिव्ह काम आवडतं. जेव्हा गोष्टी आपल्या मर्जीनुसार घडत नसतात, तेव्हा मी ब्रेक घेणं योग्य समजतो. हा माझा दृष्टीकोन आहे. त्याविषयी मी घरी पत्नीसोबत चर्चा करतो. आम्ही कॉमेडी एक्प्रेस, फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन यांसारखे शोज केले. त्यानंतर पुन्हा एकदा कॉमेडी शो केल्याने माझ्या कामात तोच-तोचपणा आला होता. एकाच धाटणीच्या कार्यक्रमांमध्ये काम करून मला मानसिक थकवा आला होता.”

कामातून ब्रेक घेण्याच्या किंवा इतर कोणत्याही निर्णयांमध्ये पत्नी पूर्णपणे साथ देत असल्याचंही त्याने सांगितलं. “अभिनेता म्हणून जेव्हा माझं करिअर काही विशेष चालत नव्हतं, तेव्हा मी छोटा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मी माझ्या पत्नीला सांगितला. तेव्हा तिनेही मला समजून घेतलं. जेव्हा गोष्टी आपल्या मर्जीनुसार घडत नसतात, तेव्हा काही वेळ थांबण्यात काहीच वाईट नाही, असं ती मला म्हणाली. आपण सगळं काही नीट मॅनेज करू, आपल्या रोजच्या जीवनावर आणि कुटुंबीयांवर लक्ष केंद्रीत करू, असं तिने समजावलं. त्या काळात तिने दिलेली साथ खूप महत्त्वाची होती”, अशा शब्दांत अंशुमनने भावना व्यक्त केल्या. कोरोना काळात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडल्यानंतर जवळपास वर्षभर हाती कोणतंच काम नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. मात्र पत्नीच्या मदतीने कुटुंबात समतोल साधण्यात कोणतीही अडचण आली नाही, असंही तो म्हणाला.