‘अनुपमा’च्या ‘काव्या’कडून रुपाली गांगुलीवर धक्कादायक आरोप; म्हणाली ‘ती दुतोंडी..’
‘अनुपमा’ या मालिकेला आतापर्यंत तोषूची भूमिका साकारणारा आशिष मल्होत्रा, समर शाहच्या भूमिकेतील अभिनेता पारस कलनावत, पाखीच्या भूमिकेतील अभिनेत्री मुस्कान बामणे या कलाकारांनी रामराम केला आहे.
‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेत काव्याची नकारात्मक भूमिका साकारून अभिनेत्री मदालसा शर्मा घराघरात पोहोचली. काही दिवसांपूर्वीच तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. मालिका सुरू असतानाच मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली आणि मदालसा यांच्यात खटके उडाल्याच्या चर्चा होत्या. याच वादामुळे मदालसाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला की काय, अशी चर्चा होती. “रुपाली गांगुली तोंडासमोर वेगळी वागते आणि मागे वेगळी वागते”, अशी टिप्पणी मदालसाने एका मुलाखतीत केली होती. वादाच्या या चर्चांवर अखेर मदालसाने प्रतिक्रिया दिली आहे.
“माणूस आपल्यासमोर जसा वागतो, तसाच आपल्या पाठीमागे वागेलच असं नाही. माझ्या मागे माझ्याचबद्दल काही वाईट गोष्टी बोलल्या गेल्या आहेत. जेव्हा मला याविषयी समजलं, तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. माझा प्रश्न होता की का असं केलं? मी कधीच तुझ्याविरोधात गेले नव्हते. आपण कलाकार आहोत, एकत्र काम करतोय. एक – दोन अशा घटना घडल्या होत्या, जिथे मी खरंच दुखावले गेले होते. रुपाली माझ्या तोंडासमोर खूप चांगली वागायची, पण माझ्याच मागे ती माझ्याबद्दल वाईट बोलायची”, असं मदालसा म्हणाली.
‘अनुपमा’ या मालिकेत रुपाली आणि मदालसा या एकमेकींच्या सवत आहेत. लॉकडाऊनच्या काळात सुरू झालेली ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. यात वनराजची भूमिका साकारणारा अभिनेता सुधांशू पांडेनंही काही दिवसांपूर्वीच ही मालिका सोडली होती. सुधांशू आणि रुपाली यांच्यातही वाद असल्याच्या चर्चा होत्या.
View this post on Instagram
‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मदालसा याविषयी म्हणाली होती, “जेव्हा मी या मालिकेत काम करायला सुरुवात केली होती, तेव्हा काव्याची भूमिका ही सक्षम आणि स्वतंत्र महिलेची होती. एका विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडण्याचं धाडस तिच्यामध्ये होतं. तिच्या भूमिकेला नकारात्मक छटा होती. कथानकानुसार त्यात बरेच बदल होत गेले. आता मालिकेची कथासुद्धा वनराज, अनुपमा आणि काव्या यांच्यासंबंधीची राहिली नाही. ही भूमिका साकारण्यात आता पहिल्यासारखी मजा येत नाही. जर काव्याच्या भूमिकेला आधीसारखंच महत्त्व असतं, तर मी या मालिकेत थांबली असती.”
मदालसा ही ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून आहे. मालिकेत ती वनराज शाहच्या दुसऱ्या पत्नीच्या भूमिकेत होती. काव्या या भूमिकेचं मालिकेत बरंच महत्त्व होतं. परंतु जसजसं कथानक बदलत गेलं, तसतसं तिच्या भूमिकेचंही महत्त्व बदलत गेलं. सुरुवातीला अनुपमाच्या विरोधात असणारी काव्या आता मालिकेत तिची खास मैत्रीण बनली होती.