‘अंबानींचं लग्न सर्कस बनलंय’; अनुराग कश्यपच्या मुलीची टीका, सांगितलं न जाण्यामागचं कारण
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी येत्या 12 जुलै रोजी राधिका मर्चंटशी लग्न करणार आहे. शाहरुख खान, सलमान खान, आमिर खानपासून सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे असे असंख्य कलाकार प्री-वेडिंग कार्यक्रमांना उपस्थित राहिले आहेत.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप त्याच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखला जातो. तर त्याची मुलगी आलिया कश्यपसुद्धा वडिलांप्रमाणेच बिनधास्त वक्तव्ये करताना दिसते. अनुरागप्रमाणेच आलियासुद्धा तिची मतं मनमोकळेपणे मांडते. आलियाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यावर आपलं बेधडक मत मांडलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग कार्यक्रम पार पडतोय. त्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमांचं आमंत्रण आलिया कश्यपलाही मिळालं होतं. मात्र तिने न जाण्याचा निर्णय घेतला. आलियाने अंबानींच्या या कार्यक्रमांना थेट ‘सर्कस’ असं म्हटलंय.
देशातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुंकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी येत्या 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. याआधीही अंबानी कुटुंबीयांनी दोन वेळा प्री-वेडिंगचं आयोजन केलं होतं. आधी जामनगर आणि त्यानंतर आलिशान क्रूझमध्ये तीन दिवसीय प्री-वेडिंग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नामवंत व्यक्तीसुद्धा सहभागी झाले होते. आता आलियाने म्हटलंय की तिलासुद्धा अंबानींच्या कार्यक्रमांचं आमंत्रण मिळालं होतं, मात्र आत्मसन्मानामुळे ती तिथे गेली नाही.
Aliyah Kashyap (Anurag Kashyap’s daughter) talks about the PR involved in the Ambani wedding on her Instagram channel. Influencers are being invited to promote wedding.
Although this is hard to digest. They don’t need the PR thing to promote the wedding + it also takes away the… pic.twitter.com/kezmfnsk0b
— Vineet Sharma (@Vineet_Sir_) July 8, 2024
आलियाने ‘गप शप विद कश्यप’ या ब्रॉडकास्ट चॅनलवर लिहिलंय की, ‘सध्या अंबानींचं लग्न हे लग्न नाही तर सर्कस बनलंय. मलासुद्धा काही कार्यक्रमांमध्ये बोलावलं गेलं होतं, मात्र हा सर्व पीआरचा (जनसंपर्क) एक भाग आहे. आता हे कशासाठी करतायत ते मला विचारू नका. म्हणून मी जाण्यास नकार दिला. कारण मला हे सिद्ध करायचं होतं की एखाद्याच्या लग्नात स्वत:ला विकण्याच्या तुलनेत माझ्याकडे थोडा अधिक आत्मसन्मान आहे. श्रीमंत लोकांकडे अधिक पैसा आहे, त्यामुळे त्याचं काय करावं हे त्यांना समजत नाहीये.’
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांना कोट्यवधी रुपये मानधन देऊन परफॉर्म करण्यासाठी बोलावलं जातंय. रिहाना, जस्टीन बिबर, केटी पेरी, बॅकस्ट्रीट बॉइज यांसारख्या कलाकारांनी अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म केलंय.
अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. आलियाने गेल्या वर्षी बॉयफ्रेंड शेन ग्रेगॉइरशी साखरपुडा केला. हे दोघं 2025 मध्ये लग्न करणार आहेत. 22 वर्षीय आलिया सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.