Gadar 2 कशामुळे इतका हिट झाला? अनुराग कश्यपने सांगितलं कारण
मुंबई | 2 सप्टेंबर 2023 : अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तारा सिंग आणि सकीनाची लव्ह स्टोरी पुन्हा एकदा हिट ठरली आहे. 22 वर्षांनंतरही चाहत्यांमध्ये ‘गदर’विषयीची क्रेझ कायम आहे. गेल्या तीन आठवड्यांत या चित्रपटाने 450 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. […]
मुंबई | 2 सप्टेंबर 2023 : अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तारा सिंग आणि सकीनाची लव्ह स्टोरी पुन्हा एकदा हिट ठरली आहे. 22 वर्षांनंतरही चाहत्यांमध्ये ‘गदर’विषयीची क्रेझ कायम आहे. गेल्या तीन आठवड्यांत या चित्रपटाने 450 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. चित्रपटाच्या या धमाकेदार यशावर आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप ‘गदर 2’च्या यशाबद्दल व्यक्त झाला आहे. ‘गदर 2’ला बॉक्स ऑफिसवर इतकं मोठं यश का मिळालं यामागचं कारण त्याने सांगितलं आहे.
अनुरागकडून ‘गदर 2’च्या टीमचं कौतुक
बॉलीवूड हंगामा या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अनुरागने सांगितलं की, त्याने अद्याप ‘गदर 2’ हा चित्रपट पाहिला नाही. मात्र तो बॉक्स ऑफिसवर इतका यशस्वी कसा ठरला यामागचं कारण त्याला ठाऊक आहे. ‘गदर 2’च्या टीमकडून चित्रपटाचं मार्केटिंग उत्तमरित्या झाल्याचं त्याने मान्य केलं. ‘गदर : एक प्रेम कथा’ हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याच वर्षी आमिर खानचे ‘लगान’ आणि ‘दिल चाहता है’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते.
‘गदर 2’ला मोठं यश का मिळालं?
‘गदर 2’ला बॉक्स ऑफिसवर इतका उत्तम प्रतिसाद का मिळाला यामागचं कारण सांगताना अनुराग म्हणाला, “गदर 2 ची संपूर्ण मार्केटिंग गदर 1 चित्रपटाबाबत होती. म्हणूनच या चित्रपटाला इतका दमदार प्रतिसाद मिळाला. कारण लोकांना 22 वर्षांपूर्वीचा गदर आठवला. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सनी देओल आणि अमीषा पटेलसुद्धा तारा सिंग आणि सकिनाच्या वेशभूषेतच दिसून आले. यातील गाण्यांना नव्या पद्धतीने प्रदर्शित करण्यात आलं. विशेष म्हणजे या चित्रपटाने कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत.”
‘गदर 2’ आणि ‘OMG 2’च्या निर्मात्यांचंही कौतुक
यावेळी अनुरागने ‘ओ माय गॉड 2’ आणि ‘गदर 2’च्या निर्मात्यांचंही कौतुक केलं. “दोन्ही चित्रपटाच्या निर्मात्यांनी कुठल्याही समुदायामध्ये फूट निर्माण करण्याची संधी म्हणून आपल्या चित्रपटाचा वापर केला नाही, हे कौतुकास्पद आहे. आज अनेक चित्रपटांबाबत असं घडताना पाहायला मिळतं. यालाच जबाबदार चित्रपट निर्मिती म्हणतात. ज्याच्यामुळे कोणताही प्रकारची अराजकता किंवा अनावश्यक वैर, द्वेष निर्माण होत नाही,” असं तो म्हणाला.