अनुराग कश्यपचा मुंबई सोडण्याचा निर्णय; बॉलिवूडवर तीव्र नाराजी, म्हणाला “मी थकलोय..”
दिग्दर्शक अनुराग कश्यपने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुंबई सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या मुलाखतीत त्याने बॉलिवूड इंडस्ट्री आणि टॅलेंट एजन्सीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "मी थकलोय", असं तो म्हणाला.
प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी ओळखले जातात. बॉलिवूड इंडस्ट्री आणि कलाकारांबद्दल ते मनमोकळेपणे आपली मतं मांडतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत थेट मुंबई सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. माझ्यातील चित्रपट बनवण्याचा उत्साहच संपला आहे, असं ते म्हणाले. यासाठी त्यांनी कलाकारांच्या टॅलेंट एजन्सींना कारणीभूत ठरवलंय. या टॅलेंट एजन्सींनी आता फंडा सुरू केला आहे, ज्यामध्ये ते कलाकारांच्या अभिनयावर नाही तर स्टार बनण्यावर जोर देत आहेत. अनुराग यांनी इंडस्ट्रीत रिस्क फॅक्टर कमी होण्याबद्दल आणि रीमेक बनवण्याबद्दल चिंता व्यक्त केली. यामुळे त्यांना नवीन काम करायला मिळत नाहीये.
मुंबई सोडण्याचा निर्णय
“आजच्या काळात मी चौकटीबाहेर जाऊन नवीन वेगळ्या प्रकारचा चित्रपट करू शकत नाही, कारण आता सर्वकाही पैशांवर आलं आहे. ज्यामध्ये निर्माते फक्त नफा आणि मार्जिनचा विचार करतायत. चित्रपट सुरू होण्यापूर्वीच प्रत्येकजण तो कसा विकायचा याचा विचार करतोय. त्यामुळे चित्रपट बनवण्याची मजाच आता संपली आहे. म्हणूनच मी नवीन वर्षात मुंबई सोडून दक्षिणेत राहायला जात आहे. जिथे प्रत्येकजण काम करण्यास उत्सुक असेल तिथे मला जायचं आहे. नाहीतर मी म्हाताऱ्यासारखा मरेन. मी माझ्या स्वत:च्याच इंडस्ट्रीबद्दल निराश आणि अस्वस्थ झालोय. इंडस्ट्रीच्या विचारानेच मी अस्वस्थ झालोय”, असं ते म्हणाले.
बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी नाराजी
हिंदी चित्रपटसृष्टीच्या विचारसरणीवर भाष्य करताना ते पुढे म्हणाले, “मंजुम्मेल बॉईजसारखा चित्रपट हिंदीमध्ये कधीच बनणार नाही. परंतु मल्याळममध्ये तो हिट होताच त्याच्या रीमेकचा विचार झाला. कारण हिंदी फिल्म इंडस्ट्री कधीही नवीन काही करण्याचा प्रयत्नच करू इच्छित नाही. पहिल्या पिढीतल्या कलाकारांसोबत काम करणं खूप अवघड झालं आहे. कारण त्यांना स्टार बनण्यात अधिक रस आहे. त्यांना अभिनय करायचा नाही. एजन्सी कोणालाच स्टार बनवत नाही, पण ज्याक्षणी ते एखाद्याला स्टार बनताना पाहतात, तेव्हा त्यांना लुटण्याचा प्रयत्न करतात. खरंतर प्रतिभा शोधण्याचं काम त्यांचं आहे. तुम्हाला रिस्क घ्यावीच लागेल.”
टॅलेंज एजन्सींवर साधला निशाणा
“जेव्हा एखादा चित्रपट बनतो, तेव्हा एजन्सी कलाकारांना उचलते आणि त्यांना स्टार बनवते. त्यांचं ब्रेनवॉश करून स्टार बनण्यासाठी कशाची गरज असते, हे त्यांना शिकवलं जातं. ते त्यांना अभिनयाच्या वर्कशॉपला पाठवत नाहीत, पण जिमला आवर्जून पाठवतात. हे सर्व ग्लॅम-ग्लॅमचं विश्व आहे, कारण त्यांना मोठा स्टार बनायचं असतं.”, अशी टीका अनुराग कश्यपने केली.
टॅलेंट एजन्सी पैसे कमावण्यावर लक्ष केंद्रीत करत आहेत. नवीन लोकांचं करिअर घडवण्यात त्यांना कमी रस आहे, असंही ते म्हणाले. अनुराग ज्यांना एकेकाळी आपले मित्र मानायचे, अशा कलाकारांबद्दलही त्यांनी या मुलाखतीत नाराजी व्यक्त केली. “माझे अभिनेते, ज्यांना मी मित्र समजत होतो, ते अचानक गायब होतात. कारण त्यांना एका विशिष्ट मार्ग बनवायचा आहे. हे बहुतेकदा इथेच घडतं. मल्याळम इंडस्ट्रीत असं घडत नाही”, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.