Shah Rukh Khan | शाहरुखसोबत कधीच काम करणार नाही अनुराग कश्यप; कारण वाचून व्हाल थक्क!
दिग्दर्शक अनुराग कश्यपने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, तो शाहरुख खानसोबत कधीच काम करू शकणार नाही. यामागचं कारणसुद्धा त्याने सविस्तर सांगितलं. तो म्हणाला, "मला शाहरुखशी काहीच समस्या नाही पण.."
मुंबई | 16 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानसोबत काम करण्यासाठी प्रत्येक दिग्दर्शक उत्सुक असतो. शाहरुख आता फक्त रोमान्सचाच नाही तर ॲक्शनचाही किंग आहे. या वर्षात त्याचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे त्याचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरले. त्यामुळे शाहरुखसोबत काम करणं हे प्रत्येक दिग्दर्शकासाठी जणू स्वप्नवतच असतं. मात्र बॉलिवूडमधील असा एक दिग्दर्शक आहे ज्याला शाहरुखसोबत कधीच काम करायचं नाहीये. हा दिग्दर्शक दुसरा तिसरा कोणी नसून अनुराग कश्यप आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यपने सांगितलं की तो शाहरुखसोबत कधीच काम करू शकणार नाही. मात्र यामागचं कारण किंग खान नसून त्याचा मोठा चाहतावर्ग असल्याचं त्याने म्हटलंय.
शाहरुखसोबत का काम करू शकत नाही?
शाहरुख खानसोबत चित्रपट केला तर तो ‘बॉम्बे वेल्वेट’सारखा फ्लॉप ठरेल अशी भीती अनुरागला आहे. 2015 मध्ये अनुरागचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये अभिनेता रणबीर कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. ‘बॉलिवूड बबल’ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अनुरागने शाहरुखसोबत काम न करण्यामागचं कारण सविस्तरपणे सांगितलं. तो म्हणाला, “मी शाहरुखसोबत काम करू शकत नाही. त्याचं व्यक्तिमत्वच इतकं मोठं आहे. मला भीती आहे की तो चित्रपट ‘बॉम्बे वेल्वेट’सारखा फ्लॉप होईल. मी त्यातच वाहून जाईन. हे खूप कठीण काम आहे. माझ्यासाठी ते एक स्वप्नवत आहे आणि ते स्वप्न तसंच राहील. तिथपर्यंत मी पोहोचू शकत नाही”
शाहरुखपेक्षा त्याच्या चाहत्यांचीच भीती
अनुराग कश्यपने शाहरुखसोबत काम करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात त्याला यश मिळालं नाही. तसंच शाहरुखच्या इतक्या मोठ्या चाहतावर्गाला मी माझ्या चित्रपटाने खुश करू शकेन असं मला वाटत नाही असंही तो म्हणाला. “तो शाहरुख खान आहे, तो किंग खान आहे, तो बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहातील मोठा अभिनेता आहे. माझी समस्या त्याच्याशी अजिबात नाही. पण त्याच्या चाहत्यांच्या रणबीर कपूरच्या चाहत्यांसारख्याच मोठ्या अपेक्षा आहेत. स्टार जितका मोठा, त्याचा चाहतावर्ग तितकाच मोठा असतो. मला त्यांचीच भीती जास्त वाटते. जर तुम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकल्या नाहीत तर त्यांचा मोठा चाहतावर्ग तुमच्यावर निराश होतो. मी सतत काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असतो. पण तुमचा चाहतावर्ग जितका मोठा असेल त्यांना तितक्या नव्या गोष्टी नको असतात. त्यामुळे त्यांना मी माझ्यावर निराश होण्याची संधी देणार नाही. म्हणूनच मी त्याच्यासोबत काम करू शकत नाही. मी त्यापासून दूर राहण्यास पसंत करेन.”