सनी देओलच्या आधी ‘या’ सेलिब्रिटींनीही घेतला बँकेकडून लोन; कर्ज न फेडल्याने एकाला जावं लागलं तुरुंगात
सनी देओल हा पहिला असा सेलिब्रिटी नाही, ज्याने बँकेकडून लोन घेतलं असेल. त्याच्या आधी इतरही मोठ्या सेलिब्रिटींनी विविध कारणांसाठी कर्ज घेतलं आहे. एका अभिनेत्याला तर कर्ज वेळेत न फेडल्याने तुरुंगवासही झाला आहे.
मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : अभिनेता आणि खासदार सनी देओलच्या जुहू इथल्या बंगल्याचा लिलाव होणार होता. मात्र लिलावाची जाहिरात प्रसिद्ध होताच अवघ्या 24 तासांत रद्द करण्यात आला. बँक ऑफ बडोदाने 56 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी रविवारी ‘सनी व्हिला’ बंगल्याच्या लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे लिलाव रद्द करण्यात आल्याचं सोमवारी बँकेनं स्पष्ट केलं. या प्रकरणामुळे सध्या सनी देओल सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. मात्र सनी देओल हा पहिला असा सेलिब्रिटी नाही, ज्याने बँकेकडून लोन घेतलं असेल. त्याच्या आधी इतरही मोठ्या सेलिब्रिटींनी विविध कारणांसाठी कर्ज घेतलं आहे. एका अभिनेत्याला तर कर्ज वेळेत न फेडल्याने तुरुंगवासही झाला आहे.
अमिताभ बच्चन
बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे एकेकाळी कर्जात बुडाले होते. त्यांनी एबीसीएल नावाने एक कंपनी सुरू केली होती. ही कंपनी दिवाळखोरीत गेल्याने बिग बींसमोर कर्जाचं मोठं डोंगर होतं. 1999 मध्ये कॅनडा बँकेनं 9 कोटी रुपयांच्या थकबाकीनिमित्त कोर्टात धाव घेतली होती. 90 च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी विविध ठिकाणाहून तब्बल 90 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. याबद्दलचा खुलासा त्यांनी अनेकदा केला आहे. मात्र मेहनत करून त्यांनी हे कर्ज फेडलं. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमुळे ते हळूहळू पूर्वपदावर आले.
राजपाल यादव
सनी देओल आणि अमिताभ बच्चन यांच्याशिवाय कॉमेडी अभिनेता राजपाल यादवसुद्धा कर्जामुळे चर्चेत होता. 2010 मध्ये त्याने दिल्लीच्या मुरली प्रोजेक्ट्स नावाच्या कंपनीकडून 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. ‘अता पता लापता’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्याने हे कर्ज घेतलं होतं. मात्र कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्याने कंपनीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी त्याला तुरुंगातही जावं लागलं होतं. 2018 मध्ये दिल्ली हायकोर्टाने राजपाल यादवला तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती.
सनी देओल
सनी देओलने बँक ऑफ बडोदाकडून कर्ज घेतलं होतं. मात्र त्या कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे त्याच्यावर 56 कोटी रुपयांची थकबाकी होती. त्याच्या वसुलीसाठी 25 सप्टेंबरला सनी व्हिलाचा लिलाव करण्यात येणार होता. यासाठी 51 कोटी 43 लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. मात्र सोमवारी बँकेकडून एक शुद्धिपत्र प्रसिद्ध करण्यात आलं. या शुद्धिपत्रानुसार हा लिलाव तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आला आहे.