सुशांत सिंह राजपूतला कसा त्रास दिला गेला? निर्मात्याने केली बॉलिवूड माफियांची पोलखोल
अपूर्वने या मुलाखतीत स्टारकिड्सवरही निशाणा साधला. "तुम्ही जर नीट पाहिलंत तर फक्त बाहेरून आलेल्या कलाकारांवरच वाईट वागणुकीचा ठपका लावला गेला. मात्र स्टारकिड्सबद्दल असं कधीच बोललं गेलं नाही", असंही तो म्हणाला.
मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीची पोलखोल केली. बॉलिवूडमध्ये तिला एका कोपऱ्याच ढकलण्यात आलं होतं आणि त्यामुळेच तिने अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला, असं प्रियांका म्हणाली. या मुलाखतीनंतर बॉलिवूडमधल्या बऱ्याच सेलिब्रिटींनी प्रियांकाला पाठिंबा दिला. आता पटकथालेखक अपूर्व आसरानीने इंडस्ट्रीचा आणखी एक चेहरा सर्वांसमोर आणला आहे. इंडस्ट्रीत काही लोकांना खूप खास वागणूक दिली जाते आणि म्हणूनच ती गँग मिळून एखाद्या कलाकाराला बॉलिवूडमधूनही बाहेर काढू शकते, असं तो म्हणाला. यावेळी त्याने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचाही उल्लेख केला.
“इंडस्ट्रीत ठराविक गँग कार्यरत”
“इंडस्ट्रीतील हे ठराविक लोक त्यांच्या गँगमधील इतर लोकांना सांगतात की अमूक एका व्यक्तीसोबत काम करू नका. त्यानंतर ते मीडिया आणि पत्रकारांना सोबत घेऊन संबंधित कलाकाराविरोधात नकारात्मक मोहीम चालवू पाहतात. काही भ्रष्टाचारी लोकांकडून डोळे बंद करून बातम्या लिहिल्या जातात आणि त्या कलाकारावर बरेच आरोप केले जातात. सेटवरील गैरवर्तणुकीचे खोटे आरोप केले जातात. या सर्वात जी व्यक्ती त्यांची साथ देत नाही, जी उघडपणे बोलण्यास घाबरत नाही त्यांना एका कोपऱ्यात ढकललं जातं”, असे आरोप अपूर्वने केले आहेत.
“प्रियांकाविरोधात चुकीची मोहीम”
2012 मध्ये प्रियांका चोप्राविरोधातही अशीच नकारात्मक मोहीम चालवली गेल्याची त्याने सांगितलं. “तिने बर्फी आणि अग्निपथ हे दोन हिट चित्रपट एका वर्षात दिले होते. मात्र वर्तमानपत्रातील मुखपृष्ठावर अशा बातम्या होत्या की कोणत्याच हिरोला तिच्यासोबत काम करायचं नाहीये. या सर्व घटनांमुळे ती अभिनेत्री किंवा स्टार म्हणून प्रगती करू शकत नव्हती”, असं ते पुढे म्हणाले.
“सुशांतसोबतही तेच घडलं”
या मुलाखतीत ते दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतविषयीही व्यक्त झाले. “सुशांतने पुरस्कार सोहळ्याला जाण्यास नकार दिला होता. त्याच्या शेवटच्या चित्रपटाने जरी 100 कोटी रुपये कमावले असले तरी त्याला फ्लॉप म्हटलं गेलं. तो अत्यंत हुशारीने बोलायचा, मात्र त्याला मानसिक समस्या असल्याचं म्हटलं गेलं. त्याला शेवटपर्यंत अनेकांकडून सुनावलं गेलं. पण सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे आपण सत्य पाहूच शकलो नाही. त्याच्याकडे बरेच प्रोजेक्ट्स होते, पण त्याला खूप माज होता असं दाखवलं गेलं”, अशा शब्दांत अपूर्व व्यक्त झाला.
अपूर्वने या मुलाखतीत स्टारकिड्सवरही निशाणा साधला. “तुम्ही जर नीट पाहिलंत तर फक्त बाहेरून आलेल्या कलाकारांवरच वाईट वागणुकीचा ठपका लावला गेला. मात्र स्टारकिड्सबद्दल असं कधीच बोललं गेलं नाही”, असंही तो म्हणाला.