निकाह करताना अरबाज खानने मोडला नियम; भडकले नेटकरी
अरबाजच्या दुसऱ्या लग्नाला मुलगा अरहान खानसुद्धा उपस्थित होता. यावेळी त्याने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. अरबाजचे आईवडील सलीम आणि सलमा खान, सावत्र आई हेलन, भाऊ सलमान खान, सोहैल खान, सोहैलची मुलं निर्वाण आणि योहान, बहीण अरविरा खान हे सर्वजण यावेळी उपस्थित होते.
मुंबई : 27 डिसेंबर 2023 | वर्ष 2023 संपण्याआधी खान कुटुंबात सनईचौघडे वाजले. अभिनेता आणि सलमान खानचा भाऊ अरबाज खान याने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी निकाह केला. या निकाहला खान कुटुंबीय आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोजके सेलिब्रिटी उपस्थित होते. 56 वर्षीय अरबाजचं हे दुसरं लग्न आहे. त्याच्या निकाहचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र अरबाज-शुराच्या निकाहमधील एक गोष्ट नेटकऱ्यांना खूप खटकली. त्यावरून या दोघांना ट्रोल केलं जातंय. अरबाजने त्याच्या निकाहमध्ये मुस्लीम धर्माचे अनेक नियम मोडले, असा आरोप काहींनी केला आहे.
मुस्लीम पद्धतीच्या निकाहमध्ये सहसा वर-वधूदरम्यान पडदा असतो. निकाह पार पडल्यानंतरच तो पडदा हटवला जातो आणि वर-वधूला एकमेकांचा चेहरा दाखवला जातो. मात्र अरबाज आणि शुरा त्यांच्या निकाहच्या वेळी एकमेकांसोबतच कोणत्याही पडद्याशिवाय दिसले. इतकंच नव्हे तर एका फोटोमध्ये शुरा निकाहच्या वेळी अरबाजच्या मिठीत पहायला मिळाली. त्यावरून काहींनी आक्षेप घेतला आहे. शुराने लग्नात डीप नेक क्रॉप ब्लाऊज आणि लेहंगा परिधान केला होता. तिच्या या कपड्यांवरूनही ट्रोल केलं जातंय. निकाहच्या वेळी वधूने तोकडे कपडे परिधान करू नये, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.
View this post on Instagram
लग्नाच्या आधी जेव्हा शुरा कारमधून अर्पिता खानच्या घरी पोहोचली, तेव्हा तिने हिजाब परिधान केला होता. त्यामुळे अरबाजसोबत ती निकाह करताना मुस्लीम धर्माचे सर्व नियम पाळणार, असा अंदाज नेटकऱ्यांना होता. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये वेगळंच चित्र दिसल्याने काहीजण भडकले आहेत. इतकंच नव्हे तर अरबाज आणि त्याची पहिली पत्नी मलायका अरोरा यांचा मुलगा अरहानने वडिलांच्या लग्नात नाचणं आणि गाणंसुद्धा काहींना आवडलं नाही.
अरबाजने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी रविवारी लग्न केलं. बहीण अर्पिता खानच्या घरीच हा लग्नसोहळा पार पडला. या निकाहला कुटुंबीय आणि मोजके पाहुणे उपस्थित होते. निकाहसाठी अरबाजने फ्लोरल कपड्यांना पसंती दिली. तर शुराने लेहंगा परिधान केला होता. आमच्या प्रियजनांच्या उपस्थितीत मी आणि माझी पत्नी या दिवसापासून आमच्या आयुष्यभराच्या प्रवासाची सुरुवात करतोय. तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांची आम्हाला गरज आहे, असं कॅप्शन देत अरबाजने लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.