जगप्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्टचा नुकताच लंडनमध्ये कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. वेम्बली स्टेडियममध्ये टेलर स्विफ्टच्या लाइव्ह कॉन्सर्टचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. या गर्दीत तिच्या असंख्य चाहत्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची दुसरी पत्नी शुरा खानसुद्धा होती. शुराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती टेलर स्विफ्टच्या कॉन्सर्टमध्ये नाचताना पहायला मिळतेय. पहिल्यांदाच शुराचा असा अंदाज नेटकऱ्यांना पहायला मिळाला आहे. त्यामुळे या व्हिडीओवर त्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
टेलर स्विफ्टच्या लाइव्ह कॉन्सर्टला एकदा तरी हजेरी लावावी, अशी तिच्या असंख्य चाहत्यांची इच्छा असते. यासाठी ते बराच पैसासुद्धा मोजतात. अरबाजची पत्नी शुरा खानसुद्धा टेलरची खूप मोठी चाहती आहे, हे या व्हिडीओतून स्पष्ट दिसतंय. मंचावर टेलर परफॉर्म करत असताना प्रेक्षकांमध्ये उभी असलेली शुरा मनमुराद नाचताना आणि गाणं म्हणताना दिसतेय. कॉन्सर्टमध्ये शुराची जागा ही स्टेजपासून खूपच लांब असली तरी तिच्या लाइव्ह गाण्याचा आनंद तिने पुरेपूर घेतला आहे. शुराच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
अरबाज खानने 25 डिसेंबर 2023 रोजी शुराशी निकाह केला होता. बहीण अर्पिता खानच्या घरातच हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला होता. त्यामध्ये मोजके कुटुंबीय आणि बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. लग्नानंतर शुरा नेहमीच अरबाजसोबत त्याचा हात पकडून चालताना किंवा त्याच्याच अवतीभवती असताना दिसली होती. पापाराझींसमोर अनेकदा तिचा संकोचलेपणा दिसून यायचा. मात्र कॉन्सर्टमधील या व्हिडीओमध्ये शुराचा एक वेगळाच अंदाज पहायला मिळतोय. विशेष म्हणजे या व्हिडीओत तिच्या आजूबाजूला अरबाज कुठेच दिसत नाहीये. अरबाज आणि शुराला अनेकदा त्यांच्या वयातील अंतरावरून ट्रोल केलं गेलं. इतकंच नव्हे तर शुरा ही अरबाजची पत्नी नव्हे तर मुलगी वाटते, असेही कमेंट्स नेटकऱ्यांनी केले होते.
‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर अरबाज आणि शुराची भेट झाली होती. शुरा ही अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानीची मेकअप आर्टिस्ट आहे. शुराला भेटल्यापासून मी स्वत:विषयी अधिक आत्मविश्वासू झालोय, असं अरबाज एका मुलाखतीत म्हणाला होता. अरबाजने याआधी अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केलं होतं. या दोघांना अरहान हा 21 वर्षांचा मुलगा आहे.