आईवडिलांचा घटस्फोट, श्रीदेवी यांच्यासोबत वडिलांचे विवाहबाह्य संबंध..; अर्जुन कपूर स्पष्टच बोलला..
अर्जुनची आई मोना शौरी यांचं 2012 मध्ये निधन झालं होतं. त्याचा 'इशकजादे' हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. कॅन्सरशी त्यांची झुंज अपयशी ठरली होती. मोना शौरी यांना घटस्फोट दिल्यानंतर बोनी कपूर यांनी अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी लग्न केलं.
निर्माते बोनी कपूर विवाहित असताना अभिनेत्री श्रीदेवी यांच्या प्रेमात पडले होते. त्यांची पहिली पत्नी मोना शौरी यांना याबद्दल पूर्ण कल्पना होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोनी कपूर आणि मोना शौरी यांचा मुलगा आणि अभिनेता अर्जुन कपूर याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. आईवडिलांच्या विभक्त होण्याचं दु:ख, त्यानंतर आईला गमावणं या सर्व गोष्टींचा त्याच्या आयुष्यावर कसा आणि किती परिणाम झाला, याविषयी त्याने सांगितलं. राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये अर्जुन म्हणाला, “जेव्हा तुम्हा एखाद्या मोठ्या धक्क्यातून जाता, तेव्हा त्याच्या आठवणी पुन्हा सांगणं कठीण असतं. मी 25 वर्षांचा असताना आईचं निधन झालं होतं. त्यावेळी माझा पहिला चित्रपट प्रदर्शित होणार होता. करिअर सुरू करतानाच मी अत्यंत क्लेशकारक घटनांचा सामना केला होता. आईच्या रुपात मी माझा पाठीचा कणाच गमावून बसलो होतो.”
आईवडिलांच्या घटस्फोटाविषयी तो पुढे म्हणाला, “मी 10 वर्षांचा असतानाच माझे आईवडील विभक्त झाले. त्याचवेळी बाबा एकाच वेळी दोन्ही चित्रपटांमध्ये व्यस्त होते. ‘प्रेम’ आणि ‘रुप की रानी चोरों का राजा’ या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी त्यांच्यावर खूप दबाव होता. त्यामुळे आमच्यात सर्वसामान्य बापलेकाचं नातंच नव्हतं. त्यांनी प्रयत्न केला नाही, अशी गोष्ट नव्हती. पण आमच्यात ते बंधच निर्माण झालं नव्हतं. आता वयाच्या 39 व्या वर्षी जेव्हा मी त्यांच्यासोबत वेळ घालवू लागलोय, तेव्हा त्यांना समजू लागतोय.”
“या सर्व घटनांमुळे मी खूप लवकर समजूतदार किंवा मोठा झालो असं म्हणेन. मला जबाबदारीने आणि समजुतदारपणे वागावं लागेल, हे मला समजलं होतं. कारण त्यावेळी ही खूप हाय-प्रोफाइल परिस्थिती होती. लहानपणी मी मस्तीखोर असलो तरी अभ्यासात खूप हुशार होतो. पण आईवडिलांच्या घटस्फोटानंतर मी अभ्यासात फारसं लक्ष दिलं नाही. कदाचित माझं ते एक प्रकारचं बंड होतं. मला शाळेत जायला आवडायचं पण आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर सर्व गोष्टी कठीण झाल्या होत्या. नेमकं काय घडतंय, हे सर्वांनाच जाणून घ्यायचं होतं. सुदैवाने त्यावेळी सोशल मीडिया नव्हता”, असं त्याने सांगितलं.
View this post on Instagram
एकीकडे पाच वर्षांनी लहान बहीण, दुसरीकडे घटस्फोटाचा सामना करणारा आई आणि तिसरीकडे मुलांसाठी वेळ काढू न शकणारे वडील.. अशा परिस्थितीचा सामना अर्जुनने केला. अशा वेळी चित्रपटांनी खूप आधार दिल्याचं अर्जुनने सांगितलं. तुझ्यासमोर आईवडील कधी भांडले का, असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “मी त्यांना कधीच भांडताना पाहिलं नव्हतं. याबाबतीत मी नशिबवान होतो. त्यांनी या गोष्टीचा आदर ठेवला. किमान मी तरी त्यांची ती बाजू पाहिली नाही. ते अत्यंत समजूतदारपणे विभक्त झाले.”
आईवडिलांच्या घटस्फोटातून तू कसा सावरलास, या प्रश्नावर अर्जुनने पुढे सांगितलं, “सुरुवातीला मी लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला असावा. पण खूप लवकर मी जबाबदारीने वागू लागलो. माझ्या वयोमानानुसार मी खूप लवकर समजूतदार झालो. कारण मला माझ्या वडिलांसोबतचं कनेक्शन तुटू द्यायचं नव्हतं. त्यामुळे मी आईवडिलांच्या घटस्फोटाच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जे काही केलं, त्याच्याशी जोपर्यंत ते खुश असतील, तोपर्यंत मीसुद्धा ठीक आहे. जरी मी ठीक नसलो तरी कमी वयातच माझ्या डोक्यात मी ही गोष्ट बिंबवली होती. ठीक आहे, जे झालं.. ते झालं.”