पायलच्या घटस्फोट देण्याच्या निर्णयावर अखेर अरमान मलिकने सोडलं मौन; म्हणाला..
सध्या 'बिग बॉस ओटीटी 3'च्या घरात रणवीर शौरी, सना मकबूल, साई केतन राव, लवकेश कटारिया, अरमान मलिक, कृतिका मलिक आणि नेझी हे स्पर्धक उरले आहेत. अनिल कपूर या सिझनचं सूत्रसंचालन करत असून हा शो प्रेक्षकांना जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळेल.
‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं सिझन युट्यूबर अरमान मलिकने चांगलंच गाजवलं आहे. हा सिझन आता अंतिम टप्प्याकडे पोहोचत असून लवकरच त्याचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. ‘बिग बॉस ओटीटी 3’ची ट्रॉफी जिंकण्यासाठी स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. आता नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अरमान आणि त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिक यांना पायल मलिकच्या घटस्फोटाच्या निर्णयाविषयी माहिती देण्यात आली. अरमान हा त्याच्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसच्या घरात आला होता. मात्र काही दिवसांतच पायल बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. त्यानंतर अरमान आणि कृतिका बिग बॉसमध्येच एकत्र आहेत. घराबाहेर पडलेल्या पायलने नुकतंच घटस्फोटाविषयी वक्तव्य केलं होतं, त्यावर आता अरमानने प्रतिक्रिया दिली आहे. ‘वीकेंड का वार’ एपिसोडदरम्यान पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हाच अरमानला पायलच्या निर्णयाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.
पायल ही घटस्फोट घेण्याचा विचार करतेय, असं या पत्रकार परिषदेत अरमान आणि कृतिकाला सांगितलं गेलं. अशा परिस्थितीत तू पायलला निवडणार की कृतिकाला, असा प्रश्न अरमानला विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “देवसुद्धा खाली धावून आले तरी आमचं नातं खराब होणार नाही. मी आणि कृतिका बिग बॉसच्या घराबाहेर पडलो की सर्वांना आम्ही तिघं पुन्हा एकत्र आनंदाने राहत असल्याचं दिसू.” अरमान, कृतिका आणि पायल मलिक यांचं गुंतागुतीचं नातं केवळ प्रेक्षकांना आकर्षिक करण्यासाठी अधोरेखित केल्याची तक्रारही काहींनी बोलून दाखवली. त्यावर उत्तर देताना अरमानने सांगितलं, “आमचं नातं हे प्रामाणिक आहे आणि त्यात कोणत्याही फसवणुकीला जागा नाही.”
View this post on Instagram
अरमान जेव्हा त्याच्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसच्या शोमध्ये आला, तेव्हा त्याच्यावर अनेकांनी बहुपत्नीत्वला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला होता. अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने अरमानविरोधात सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली होती. या आरोपांवर उत्तर देताना अरमानने स्पष्ट केलं, “माझं आयुष्य म्हणजे खुलं किताब आहे. माझ्या सर्व लग्नांना स्वीकार करण्याची माझ्यात हिंमत आहे. माझ्यासारखे अनेकजण या जगात आहेत. जर माझ्या दोन्ही पत्नींना काहीच समस्या नाही, तर मी जगाची पर्वा का करू? राहता राहिला प्रश्न पायलने घटस्फोट देण्याचा, तर मी सांगू इच्छितो की आम्ही कधीच विभक्त होणार नाही.”
या पत्रकार परिषदेत कृतिकानेही तिच्यावर झालेल्या आरोपांबद्दल प्रतिक्रिया दिली. कृतिकाने तिचीच खास मैत्रीण पायलची फसवणूक करत अरमानशी लग्न केलं, असा आरोप झाला होता. त्यावर ती म्हणाली, “मी असे कमेंट्स गेल्या सात वर्षांपासून ऐकतेय. मला त्याने काही फरक पडत नाही.”