‘बिग बॉस ओटीटी 3’ हा खुलाशांचा सिझन बनला आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये स्पर्धकांकडून नवनवीन खुलासे होत आहेत. या सिझनमध्ये सर्वाधिक चर्चा ही युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नींची आहे. नुकतीच त्यापैकी पहिली पत्नी पायल ही बिग बॉसच्या घराबाहेर पडली आहे. त्यानंतर कृतिकासोबतच्या त्याच्या नात्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. घराबाहेर पडल्यानंतर पायल तिच्या पतीच्या दुसऱ्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त होतेय. अरमानने दुसरं लग्न करून माझी फसवणूक केली, असंही तिने म्हटलंय. अरमानने केवळ पायल आणि कृतिकासोबतच नाही तर या दोघींच्याही आधी आणखी एकीशी लग्न केलं होतं. एकीकडे त्याच्या तीन लग्नांची चर्चा असताना दुसरीकडे दिल्लीची ‘वडापाव गर्ल’ चंद्रिका दीक्षितने नवा खुलासा केला आहे. चंद्रिकाने सांगितलं की तिच्या वडिलांची एक-दोन नव्हे तर पाच लग्न झाली आहेत. यामुळेच त्यांचा द्वेष करत असल्याचा खुलासा तिने केला आहे.
“मी सहा वर्षांची असताना माझ्या आईचं निधन झालं होतं. पण आईच्या निधनानंतर मी माझ्या वडिलांसोबत कधीच प्रेमाने राहू शकले नाही. त्यांनी माझी कधीच काळजी घेतली नाही. ते नेहमी मला नातेवाईकांकडे सोडून जायचे. आईच्या निधनानंतर ते व्यसनाधीन झाले होते. त्यांनी चार ते पाच वेळा लग्न केलं आणि कधीच कोणाची पर्वा केली नाही. जेव्हा मला वडिलांची सर्वाधिक गरज होती, तेव्हा त्यांनी माझी साथ दिली नाही. माझं संगोपन माझ्या आजीने केलं”, असं चंद्रिका म्हणाली. तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेताच रणवीर शौरीला आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याला तिच्याबद्दल वाईटही वाटलं.
युट्यूबर अरमान मलिकबद्दल बोलायचं झाल्यास, त्याने आतापर्यंत तीन लग्न केले आहेत. पायल ही त्याची दुसरी आणि कृतिका ही त्याची तिसरी पत्नी आहे. या दोघींच्या आधी त्याने कमी वयात एकीशी लग्न केलं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर अरमानने तिला घटस्फोट आणि काही पैसेसुद्धा दिले. अरमानच्या त्या पहिल्या पत्नीनेही आता दुसरं लग्न केलं आहे. कायदेशीररित्या मीच अरमानची पत्नी आहे, असं पायलने म्हटलं होतं. आता चंद्रिकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, तिच्या वडिलांनी अरमानलाही मागे टाकल्याच्या कमेंट्स नेटकरी करत आहेत.