प्रभास तर जोकरच..; ‘कल्की 2898 एडी’वर टीका केल्यानंतर अर्शद वारसीचं स्पष्टीकरण
‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली होती. तर प्रभास हा भैरवच्या भूमिकेत होता. एका मुलाखतीत अर्शदने प्रभासच्या या भूमिकेवर खूप नाराजी व्यक्त केली होती. तुम्ही प्रभासला जोकर बनवलात, असं तो निर्मात्यांना म्हणाला.
अभिनेता प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, कमल हासन, प्रभास यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. काही दिवसांपूर्वीच अभिनेता अर्शद वारसीने या चित्रपटाबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं होतं. त्याने ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाविषयी नाराजी व्यक्त करत प्रभासवर टीका केली होती. “प्रभास तर या चित्रपटात जोकर दिसत होता”, असं अर्शद म्हणाला होता. यानंतर प्रभासच्या चाहत्यांकडून अर्शदवर जोरदार टीका झाली होती. इतकंच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनीही यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आता अर्शदने प्रतिक्रिया दिली आहे.
अर्शद वारसीचं स्पष्टीकरण-
नुकत्याच पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात अर्शद या वादावर मोकळेपणे व्यक्त झाला. तो म्हणाला, “प्रत्येकाला एक दृष्टीकोन असतो आणि लोकांना आपापला अर्थ लावायला आवडतं. मी त्या भूमिकेविषयी बोललो होतो, व्यक्तीविषयी नाही. तो (प्रभास) प्रतिभावान कलाकार आहे आणि त्याने स्वत:ला पुन्हा पुन्हा सिद्ध केलंय. हे आपल्याला माहीत आहे. पण जेव्हा आपण एखाद्या चांगल्या कलाकाराला वाईट भूमिका देतो, तेव्हा प्रेक्षकांसाठी ते निराशाजनक ठरतं.”
काय म्हणाला होता अर्शद?
“मी कल्की हा चित्रपट पाहिला, पण मला तर तो अजिबात आवडला नाही. मला खूप त्रास होतो जेव्हा.. (वाक्य अर्धवटच म्हणतो.) पण अमितजींचं काम अप्रतिम होतं. मी त्यांना समजूच शकत नाही. त्या व्यक्तीकडे जी ताकद आहे, ती आपल्याला मिळाली ना, तर आयुष्य कमालीचं होईल. ते खरे आहेत असं वाटतच नाही. पण प्रभास, मी खरंच खूप निराश झालोय. तो असा का.. तो जोकरसारखा दिसत होता. का? मला मॅड मॅक्स पहायचा आहे. मला तिथे मेल गिब्सनला पहायचं आहे. तुम्ही त्याला काय बनवलं यार? असं तुम्ही का करता? मला समजत नाही,” अशा शब्दांत त्याने नाराजी व्यक्त केली होती.