Nitin Desai | जिथे घालवले अखेरचे क्षण, त्याच ठिकाणी नितीन देसाई यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
चौक इथल्या एनडी स्टुडिओमध्ये मंगळवारी रात्री आल्यानंतर देसाई यांनी त्यांच्या एका कर्मचाऱ्याला बोलावून सकाळी हा रेकॉर्डर काही व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना केल्या. बुधवारी सकाळी तोच कर्मचारी त्यांना भेटायला गेला असता त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत देसाई यांचा मृतदेह आढळला.
कर्जत | 3 ऑगस्ट 2023 : मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांच्या भव्यदिव्य देखाव्यांनी सजलेल्या ज्या स्टुडिओच्या उभारणीत अनेक वर्षे घालवली, त्याच स्टुडिओतील मध्यभागी असलेल्या मंचावर कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागे कर्जाचं डोंगर आणि फसलेलं अर्थ नियोजन असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच नितीन देसाई यांच्या पत्नी नयना, मुलगी मानसी, बंधू श्रीकांत स्टुडिओमध्ये दाखल झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांनी उभारलेल्या एनडी स्टुडिओच्या परिसरातच अंत्यसंस्कार व्हावेत, अशी इच्छा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार आज (गुरुवार) किंवा शुक्रवारी चौक इथं अंत्यविधी केले जातील, अशी माहिती देसाई कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी दिली.
नितीन देसाई यांचा व्हॉइस रेकॉर्डर
नितीन देसाई यांची मुलं अमेरिकेत राहतात. वडिलांच्या आत्महत्येविषयी कळताच ते तिथून निघाले आहेत. जेव्हा मुलं भारतात पोहोचतील, तेव्हा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. चौक इथल्या एनडी स्टुडिओमध्ये मंगळवारी रात्री आल्यानंतर देसाई यांनी त्यांच्या एका कर्मचाऱ्याला बोलावून सकाळी हा रेकॉर्डर काही व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना केल्या. बुधवारी सकाळी तोच कर्मचारी त्यांना भेटायला गेला असता त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत देसाई यांचा मृतदेह आढळला. त्यांचा व्हॉईस रेकॉर्डर शेजारी पडला होता.
कर्जाचं डोंगर
नितीन देसाई यांच्या एनडीज आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडने एडेलवाईज समूहातील ईसीएल फायनान्सकडून 2016 आणि 2018 असे दोन टप्प्यांत एकूण 181 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं गोतं. 31 मार्च 2022 आणि 9 मे 2022 अशा अनुक्रमे या दोन मुदत कर्जाच्या परतफेडीच्या अंतिम तारखा होत्या. त्या पाळल्या न गेल्याने कर्ज बुडीत खात्यात अर्थात एनपीए म्हणून वर्ग केलं होतं.
आधुनिक युगाचा विश्वकर्मा
नितीन देसाई यांना आधुनिक युगाचा विश्वकर्मा ही उपाधी मिळाली होती. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी मराठी- हिंदी चित्रपट, मालिकांसाठी उभारलेले सेट्स, दरवर्षी त्यांच्या कल्पनेतून उभे राहणारे लालबाग राजासारखे नामांकित गणेश मंडळांचे देखावे, मेक इन इंडियापासून अनेक छोट्या-मोठ्या राजकीय, सरकारी सोहळ्यांसाठी त्यांनी केलेले कलादिग्दर्शन आणि त्यांच्या कल्पनेतून उभा राहिलेला एनडी स्टुडिओ त्यांच्यातील सतत नवनिर्मितीचा ध्यास असलेल्या विश्वकर्म्याची ग्वाही देत आहेत.