‘आर्टिकल 370’ थिएटरमध्ये पहायचाय? त्याआधी रिव्ह्यू नक्की वाचा!
2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात काश्मिरी पंडितांच्या वेदना दाखवण्यात आल्या होत्या. आता ‘आर्टिकल 370’ या चित्रपटात कलम 370 हटवण्यावरून झालेला गदारोळ दर्शविण्यात येणार आहे.
मुंबई : 23 फेब्रुवारी 2024 | ‘लॉस्ट’ आणि ‘चोर निकल के भागा’ यांसारख्या चित्रपटांद्वारे ओटीटीविश्वात आणि ‘ओएमजी 2’द्वारे बॉक्स ऑफिसवर आपली विशेष छाप सोडणारी अभिनेत्री यामी गौतम सध्या तिच्या ‘आर्टिकल 370’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आदित्य जांभळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती यामीचा पती आदित्य धर आणि ज्योती देशपांडे यांनी मिळून केली आहे. यामध्ये यामीसोबत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रियामणी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये पाहायचा प्लॅन करत असाल, तर आधी त्याचा रिव्ह्यू नक्की वाचा..
आर्टिकल 370 हे राज्यघटनेत 17 ऑक्टोबर 1949 रोजी समाविष्ट करण्यात आलं. या कलमानुसार भारताची राज्यघटना काही कलमांचा अपवाद वगळता काश्मीरला लागू होत नाही, त्यामुळे काश्मीरला स्वत:ची राज्यघटना तयार करण्याची परवानगी देण्यात आली. ‘आर्टिकल 370’ या चित्रपटात भारतीय संविधानातील आर्टिकल 370 संबंधित कथा दाखवण्यात आली आहे. काश्मीरमध्ये काय स्थिती होती आणि आर्टिकल 370 हटवण्यासाठी काय-काय करावं लागलं हे सर्व या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटात यामीने जुबी हस्करची भूमिका साकारली आहे. ती एक स्थानिक एजंट असून क्रिमिनल मिशनवर काम करत असते.
‘ARTICLE 370’ SPECIAL SCREENING IN MUMBAI… The cast and crew of #Article370 at the special screening of the film in #Mumbai today, before its big release tomorrow. pic.twitter.com/Qr6JFnNwpA
— taran adarsh (@taran_adarsh) February 22, 2024
या चित्रपटात प्रियामणीला राजेश्वरी स्वामीनाथनच्या भूमिकेत दाखवलं गेलंय. तर रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारलेले अभिनेते अरुण गोविल या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत दिसले. अभिनेते किरण करमरकर यांनी अमित शाह यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेल्यांनी सोशल मीडियावर आपलं मत मांडलं आहे. यात अनेकांनी यामी आणि प्रियामणीच्या अभिनयाचं कौतुक केलंय. आर्टिकल 370 काय होतं आणि ते रद्द करणं का गरजेचं होतं, हे जाणून घ्यायचं असेल तर हा चित्रपट आवर्जून पहा, असं अनेकांनी म्हटलंय. अनेकांनी या चित्रपटाला साडेतीन ते चार स्टार्स दिले आहेत. चित्रपटाती कथा पूर्णवेळ प्रेक्षकांना खिळवून ठेवते, असंही काहींनी म्हटलंय.
या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर विद्युत जामवाल आणि अर्जुन रामपालच्या ‘क्रॅक’ या चित्रपटाशी आहे. त्यामुळे कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जम्मूमध्ये आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाचा उल्लेख करत म्हटलं होतं की “आर्टिकल 370 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, असं मी ऐकलंय. या चित्रपटाद्वारे लोकांना त्याविषयी योग्य माहिती मिळण्यास मदत होईल.”