अयोध्येत ऐश्वर्यासोबत लग्नगाठ बांधणार अभिनेता; राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी केला साखरपुडा
22 जानेवारी हा दिवस देशातील अनेकांसाठी ऐतिहासिक ठरला. अयोध्येतील राम मंदिरात यादिवशी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. याच दिवशी अरुण राम गौडाने ऐश्वर्यासोबत साखरपुडा केला. आता या वर्षाच्या अखेरीस हे दोघं अयोध्येतच लग्नबंधनात अडकणार आहेत.
चेन्नई : 28 जानेवारी 2024 | अयोध्येतील राम मंदिरात पार पडलेला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दिवस हा देशभरातील अनेक भक्तांसाठी अत्यंत खास होता. म्हणूनच काहींनी बाळाच्या डिलिव्हरीसाठी हा दिवस निवडला तर काहींनी यादिवशी साखरपुडा केला. यामध्ये कन्नड चित्रपट अभिनेता अरुण राम गौडा आणि ऐश्वर्या यांचाही समावेश आहे. या दोघांनी 22 जानेवारी रोजी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी साखरपुडा केला. अरुण आणि ऐश्वर्या लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. याविषयी अरुणने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माहिती दिली.
22 जानेवारी रोजी अरुण आणि ऐश्वर्या यांनी मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. याविषयी अरुणने सांगितलं, “मी प्रभू श्रीराम यांचा भक्त असल्याने मला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीच साखरपुडा करायचा होता. आम्ही अत्यंत साध्या पद्धतीने साखरपुडा केला. जवळपास गेल्या दहा वर्षांपासून आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. ‘गेरेयारा बालागा’ या नाटकाच्या ग्रुपमध्ये आम्ही एकमेकांना पहिल्यांदा भेटलो. त्यावेळी आम्ही खूपच लहान होतो. तेव्हा आम्ही करिअरवर अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतला. स्वत:च्या पायावर उभं राहिल्यानंतर आता आम्ही आमच्या नात्यात पुढचं पाऊल उचलण्याचं ठरवलं आहे. आम्हा दोघांचेही कुटुंबीय खूप खुश आहेत, कारण या दिवसाची त्यांनी इतके दिवस प्रतिक्षा केली होती.”
View this post on Instagram
या मुलाखतीत अरुण त्याची होणारी पत्नी ऐश्वर्याबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाला. “ऐश्वर्या खूप प्रामाणिक आणि समजूतदार जोडीदार आहे. माझाही रेस्टॉरंटचा बिझनेस आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधण्यात किती कसरत करावी लागते, हे ती समजून घेते. आम्ही या वर्षाच्या अखेरीस लग्न करणार आहोत. अयोध्येतच लग्न करण्याचं आमचं स्वप्न आहे”, असं त्याने सांगितलं.
अरुण राम गौडाला ‘प्याते मंडी काडिग बंद्रू’ या कन्नड रिअॅलिटी शोमुळे लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. 2015 मध्ये त्याने कन्नड चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. ‘मुद्दू मानसे’ या चित्रपटातून त्याने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर त्याने चार कन्नड चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.