नवी दिल्ली: एस. एस. राजामौली यांच्या RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या कॅटेगरीमध्ये या गाण्याने बाजी मारली. या विजयानंतर संपूर्ण देशभरातून चित्रपटाच्या टीमवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. कारण गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकणारा RRR हा आशियातील पहिला चित्रपट ठरला आहे. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच आम आदमी पार्टीच्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कारण या व्हिडीओत चक्क दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ‘नाटू नाटू’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.
आम आदमी पार्टीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर RRR चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देणारी ही पोस्ट आहे. यामध्ये पहिला फोटो हा संगीतकार किरवाणी यांचा ट्रॉफीसोबतचा आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये नाटू नाटू गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ पहायला मिळत आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्याचा आनंद साजरा करत केजरीवाल आणि भगवंत मान नाटू नाटू गाण्यावर नाचताना दिसत आहेत. केजरीवाल आणि भगवंत मान यांच्या चेहऱ्याचा फोटो वापरत हा व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे.
मात्र हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे. आतापर्यंत त्याला 60 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. ‘नेक्स्ट लेव्हल सेलिब्रेशन’ असं एका युजरने म्हटलंय. तर ‘एडिटिंग आवडलंय’ असं दुसऱ्याने लिहिलं आहे. अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.
‘नाटू नाटू’ या गाण्यावरील डान्सची कोरिओग्राफी प्रेम रक्षितने केली आहे. या गाण्याला कोरिओग्राफ करायला प्रेम रक्षित यांना दोन महिने लागले. या संपूर्ण गाण्यात त्याने रामचरण आणि ज्युनिअर एनटीआरसाठी 110 स्टेप्स तयार केले होते. या संपूर्ण प्रवासात राजामौली यांनी खूप साथ दिल्याचं त्याने म्हटलं आहे.