Ketaki Chitale: “केतकीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे”; शरद पवारांविषयी पोस्टप्रकरणी आसावरी जोशी, मानसी नाईक यांची प्रतिक्रिया
"सोशल मीडियावर आपण काहीही पोस्ट करू शकतो, रिपोस्ट करू शकतो असं जर का प्रत्येकाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे," असं आसावरी म्हणाल्या. तर असं पुन्हा कोणी करू नये म्हणून कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया मानसी नाईकने दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात अभिनेत्री केतकी चितळेनं (Ketaki Chitale) फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केतकीविरोधात मुंबईतही तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिने लिहिलेल्या पोस्टनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टीकेची झोड सुरू केली. आता कलाविश्वातील अनेक मंडळींनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अभिनेत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाची महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा आसावरी जोशी (Asawari Joshi) आणि अभिनेत्री मानसी नाईक हिनेसुद्धा केतकीवर टीका केली आहे. “सोशल मीडियावर आपण काहीही पोस्ट करू शकतो, रिपोस्ट करू शकतो असं जर का प्रत्येकाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे,” असं आसावरी म्हणाल्या. तर असं पुन्हा कोणी करू नये म्हणून कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया मानसी नाईकने दिली.
काय म्हणाल्या आसावरी जोशी?
“सोशल मीडियावर प्रत्येकजण आपल्या भावना व्यक्त करत असतो, मग त्यात राग, प्रेम, आनंद, सूड, अपमान अशा अनेक गोष्टी असतात. पण त्याला कुठेतरी एक मर्यादा असायला हवी. त्याला आवर घालायला हवा, असं मला वाटतं. सोशल मीडियावर आपण काहीही पोस्ट करू शकतो, रिपोस्ट करू शकतो असं जर का प्रत्येकाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. महाराष्ट्रात काही व्यक्तीमत्त्व अतिशय आदरणीय आहेत. त्यांच्याबद्दल असा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जातो, ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. आपले संस्कार अशा पद्धतीची शिकवण देत नाहीत. अशा आक्षेपार्ह मजकुरासाठी तुकोबांच्या अभंगाचा वापर केला, ही त्यातून निंदनीय बाब आहे. आपली संत परंपरा ही चांगली दिशा दाखवण्याचं काम करतं. त्याचा वापर या असल्या घाणेरड्या कामासाठी करणं हा त्या वाङमयाचासुद्धा अपमान आहे. ही पोस्ट ज्याने लिहिली, ते वकील आहेत. नितीन भावे असं त्या पोस्टमध्ये नाव आहे. अत्यंत सुशिक्षित, वकील असलेला हा माणूस ही अशा पद्धतीची पोस्ट लिहितो. यातून विकृती दिसून येते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा प्रत्येकाने समजून घ्यायला हव्यात. हे सगळं करून काय मिळतं, असा प्रश्न आहे,” असं त्या म्हणाल्या.
पहा व्हिडीओ-
काय म्हणाली मानसी नाईक?
“मी जेव्हा ती पोस्ट वाचली, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. आपण मराठी आहोत, मराठी कलाकाराने असं कुणाबाबतही बोलणं अत्यंत लज्जास्पद आहे. मी स्वत: आणि आपण सगळेच त्यांना खूप मानतो. फक्त देशातच नाही तर देशाबाहेरही ते खूप मोठं व्यक्तीमत्त्व आहे. केतकीने जे केलं ते बरोबर नाही. असं कोणीच करू नये. असं पुन्हा कोणी करू नये म्हणून कठोर शिक्षा झालीच पाहिजे. लोकांनी अशी पोस्ट लिहिण्यापूर्वी किंवा बोलण्यापूर्वी दोनदा विचार करायला हवा,” अशी प्रतिक्रिया मानसीने दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी शनिवारी केतकीविरोधात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकने तिला शनिवारी नवी मुंबईतील कळंबोली इथून अटक केली होती. रविवारी सकाळी तिला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने तिला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.