हल्ली दर महिन्याला घटस्फोट..; तरुण पिढीबद्दल काय म्हणाल्या आशा भोसले?
आशा भोसले यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तरुण पिढीमध्ये वाढणाऱ्या घटस्फोटाच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. त्याचसोबत बाळ जन्माला घालणं म्हणजे ओझं समजणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली.
दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले या गेल्या अनेक वर्षांपासून कलाविश्वात कार्यरत आहेत. शेकडो कलाकारांना त्यांनी आपला आवाज दिला आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात त्या तरुण पिढीच्या दृष्टीकोनाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या. लग्नाबद्दल या पिढीचा दृष्टीकोनच वेगळा असून ते टिकवण्यासाठी पुरेसे प्रयत्न न करताच घटस्फोटाचा निर्णय घेण्याची घाई करतात, असं त्या म्हणाल्या. अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्यासोबत साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी हा प्रश्न विचारला. “आजकालची तरुण दाम्पत्य इतक्या घाईने घटस्फोटाचा निर्णय का घेतात”, असा सवाल त्यांनी रविशंकर यांना केला. यावेळी आशा भोसले यांनी त्यांचाही अनुभव सांगितला. पतीसोबत जेव्हा कधी भांडणं व्हायची तेव्हा काही दिवस मुलांना घेऊन मी आईकडे राहायला जायची, असं त्यांनी सांगितलं.
“भांडणानंतर मी मुलांना घेऊन माहेरी निघून जायची. पण मी कधीच पतीला घटस्फोट देण्याचा विचार केला नाही. पण हल्लीचे कपल्स दर महिन्याला एकमेकांना घटस्फोटाची कागदपत्रं पाठवत असल्याचं मी ऐकलंय. गुरुदेव, हे असं का होतंय”, असं त्या रविशंकर यांना विचारतात. त्यावर उत्तर देताना रविशंकर म्हणतात की आजच्या काळात फार कमी लोकांमध्ये आशा भोसलेंइतकी चिकाटी आणि संयम असतो. “तुम्ही गाणी गात राहिलात आणि प्रत्येकाला खुश केलंत. तुमचा देवावरही विश्वास आहे आणि संकटांना सामोरं जाण्यासाठीची ताकद, त्यांना सहन करण्याचा संयमही तुमच्यात आहे. हल्ली लोकांमधील सहन करण्याची ताकद कमी होत चालली आहे”, असंही ते पुढे म्हणाले.
“मी फिल्म इंडस्ट्रीत इतकी वर्षं काम केलंय आणि अनेक लोकांना मी पाहिलंय पण पूर्वीची लोकं आताच्या पिढीसारखी टोकाची भूमिका पटापट घेत नव्हती. मला असं वाटतं की आताच्या पिढीच्या जोड्यांमधील प्रेम फार लवकर संपतं आणि ते एकमेकांना लगेच कंटाळतात. कदाचित हे एक मुख्य कारण असू शकतं”, असं आशा भोसले पुढे म्हणतात. तर रविशंकरसुद्धा सहमती दर्शवतात.
आशा भोसले या 16 वर्षांच्या असताना गणपतराव भोसले यांच्यासोबत पळून गेल्या होत्या. 31 वर्षीय गणपतराव हे आशा यांच्या मोठ्या बहिणीचे सेक्रेटरी होते. कुटुंबीयांच्या मर्जीविरोधात जाऊन दोघांनी लग्न केलं होतं. या दोघांना तीन मुलं आहेत. 1960 मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर आशा भोसलेंनी संगीत दिग्दर्शक आणि अभिनेते आरडी बर्मन यांच्या 1980 मध्ये दुसरं लग्न केलं. 1994 मध्ये आरडी बर्मन यांचं निधन झालं होतं.
“हल्ली महिलांना बाळ जन्माला घालणं म्हणजे एक ओझं वाटतं. मी वयाच्या दहाव्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली होती. मला तीन मुलं आहेत आणि तिघांचा मी सांभाळ केला. तिघांची लग्न पार पडली आणि आता मला नातवंडंही आहेत. मी यशस्वीपणे माझ्या सर्व जबाबदाऱ्या पार पडल्या, तेसुद्धा पतीशिवाय. दिवसरात्र काम करून, व्यग्र वेळापत्रक असतानाही मी हे सर्व केलं”, असं आशा भोसले यांनी सांगितलं. हल्ली कुटुंब आणि करिअर या दोन्ही जबाबदाऱ्या एकत्र का सांभाळल्या जात नाहीत, असाही सवाल त्यांनी केला.