देख रहा है न..; Cannes 2024 पोहोचला ‘पंचायत’चा बिनोद, 10 मिनिटांपर्यंत लोकांनी वाजवल्या टाळ्या
'पंचायत' या वेब सीरिजमधील बिनोद आठवतोय का? तोच बिनोद आता 'कान फिल्म फेस्टिव्हल 2024'मध्ये पोहोचला आहे. अभिनेता अशोक पाठकने 'पंचायत'मध्ये बिनोदची भूमिका साकारली होती. आता 'कान'मध्ये त्याचाच डंका वाजला आहे.
ज्यांना ओटीटीवरील विविध कंटेट पाहण्याची आवड असते, त्यांना ‘पंचायत’ ही वेब सीरिज आवर्जून माहित असेल. या वेब सीरिजचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यातील प्रत्येक भूमिकेचं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या सीरिजमध्ये ‘बिनोद’ची भूमिका साकारणारा अशोक पाठक सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. ‘पंचायत’मुळे त्यालाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र आता तोच ‘बिनोद’ आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचला आहे. अशोक ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये पोहोचला आणि तिथे लोकांनी उभं राहून त्याच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट केला. आपल्या ‘सिस्टर मिडनाइट’ या चित्रपटाच्या प्रीमिअरसाठी तो कानमध्ये पोहोचला होता. हा चित्रपट सर्वांना इतका आवडला की प्रीमिअरनंतर सर्वजण उभे राहून टाळ्या वाजवू लागले होते.
‘सिस्टर मिडनाइट’ या चित्रपटात अशोक पाठक आणि राधिका आपटे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटावर कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वांकडून भरभरून प्रेमाचा वर्षाव झाला. त्याचसोबत ‘पंचायत’मध्ये अत्यंत साधासुधा दिसणारा ‘बिनोद’ कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचताच ग्लॅमरस झाला आहे. त्याने सोशल मीडियावर फ्रेंच रिवेरा इथले काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये त्याने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केल्याचं पहायला मिळतंय. त्याच्या या यशावर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
View this post on Instagram
काही नेटकरी ‘पंचायत’ या वेब सीरिजमधील जर्दावाल्या सीनचा उल्लेख करत मजेशीर कमेंट करत आहेत. ‘बडा आदमी बन गया है बिनोद, अब जर्दा नहीं खाता’, असा डायलॉग एका युजरने लिहिला. सीरिजमधील त्याचा हा डायलॉग खूप गाजला होता. तर ‘बिनोद आता पंचायत 4 ची तयारी सुरू कर’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘पंचायत’ या सीरिजच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. हा तिसरा सिझन येत्या 28 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अशोक पाठकने ‘बिट्टू बॉस’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. गेल्या 11 वर्षांच्या या कारकिर्दीत त्याने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये ‘शांघाई’, ‘द फील्ड’, ‘सात उचक्के’, ‘अ डेथ इन द गुंज’, ‘पकाऊ क्लास ऑफ 83’, ‘सेक्रेड गेम्स’, ‘आर्या’, ‘काठमांडू कनेक्शन 2’ यांचा समावेश आहे.