मुंबई : अभिनेता आमिर खानसोबत ‘गजनी’ या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री असिन गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. लग्नानंतर असिनने तिच्या वैवाहिक आयुष्यावर लक्ष केंद्रीत केलं आणि चित्रपटांना रामराम केला. मात्र आता ती तिच्या खासगी आयुष्यामुळेच सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. असिन तिच्या पतीला घटस्फोट घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तिने व्यावसायिक राहुल शर्माशी लग्न केलं आहे. पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावरून डिलिट केल्यानंतर तिच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली. त्यावर आता असिनने मौन सोडलं आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहित घटस्फोटाबाबतच्या चर्चांवर खुलासा केला आहे.
‘मी सध्या आमच्या उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेतेय. आम्ही दोघं अक्षरश: एकमेकांसमोर बसून नाश्त्याचा आस्वाद घेतोय आणि त्याच वेळी अत्यंत तथ्यहीन आणि इतरांच्या कल्पनेतून निर्माण झालेली बातमी वाचायला मिळाली. या बातम्या वाचून मला त्या काळाची आठवण झाली, जेव्हा आम्ही दोघं आमच्या कुटुंबीयांसोबत बसून लग्नाची प्लॅनिंग करत होतो आणि त्याचवेळी आमच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या. खरंच? तुम्ही यापेक्षा खूप चांगलं काहीतरी करू शकता’, असं तिने लिहिलं. अत्यंत आरामदायी सुट्ट्यांमधील पाच मिनिटं वाया घालवल्याने निराश असल्याचंही तिने पुढे म्हटलंय.
असिनने पती राहुलसोबतचे सर्व फोटो डिलिट केले असून इन्स्टाग्रामवर या दोघांचा फक्त एकच फोटो पहायला मिळतोय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तिने तिच्या लग्नाचेही फोटो डिलिट केले आहेत. याच कारणामुळे तिच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. ‘गजनी’ चित्रपटाने असिनला बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली. त्याआधी तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. नंतर तिने अक्षय कुमारसोबतही काही चित्रपटात काम केलं. 2016 मध्ये असिनने मायक्रोमॅक्सचे संस्थापक राहुल शर्माशी लग्न केलं.
असिन आणि राहुल यांना एकत्र आणण्यात अभिनेता अक्षय कुमारचं मोठं योगदान आहे. 2012 मध्ये असिन अक्षय कुमारसोबत त्यांच्या ‘हाऊसफुल 2’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बांगलादेशला जात होती. हे दोघं प्रायव्हेट जेटने प्रवास करत होते. त्याचवेळी अक्षयने असिनची भेट राहुलशी करून दिली. असिनला त्यावेळी माहीत नव्हतं की ज्या प्रायव्हेट जेटने ती अक्षयसोबत गेली, तो राहुलचा होता. इतकंच नव्हे तर ज्या कार्यक्रमाला ती परफॉर्म करण्यासाठी जात होती, त्याचं आयोजनसुद्धा राहुलनेच केलं होतं.