वयाच्या 41 वर्षी आई होणार अक्षय कुमारची हिरोईन; ‘आवारा पागल दिवाना’मध्ये साकारली होती भूमिका
'आवारा पागल दिवाना', 'पार्टनर', 'शूटआऊट ॲट लोखंडवाला' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री आरती छाबडियाने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. वयाच्या 41 व्या वर्षी ती गरोदर आहे.
‘आवारा पागल दिवाना’ या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री आरती छाबडिया बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर ती सक्रिय असून चाहत्यांसोबत विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. नुकतीच तिने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. लग्नाच्या पाच वर्षांनंतर वयाच्या 41 व्या वर्षी आरती आई होणार आहे. तिने 23 जून 2019 मध्ये विशारद बीडासीशी लग्न केलं होतं. विशारद हा ऑस्ट्रेलियामध्ये चार्टर्ड अकाऊंटंट आहे. नुकतेच आरतीने तिच्या मॅटर्निटी शूटचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
आरतीने गुड न्यूज सांगितल्यानंतर चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मॅटर्निटी फोटोशूटमध्ये तिने ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करून बेबी बंप दाखवला आहे. गरोदरपणातील तेज तिच्या चेहऱ्यावर सहज दिसून येत आहे. आरती आणि विशारदने अरेंज मॅरेज केलंय. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांनी 2019 मध्ये लग्नगाठ बांधली होती. आता लग्नाच्या पाच वर्षांनंतर हे दोघं आई-बाबा होणार आहेत.
View this post on Instagram
आरती गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी तिला अभिनयक्षेत्रात पुनरागमन करायचं आहे. अभिनेत्रीसोबतच ती दिग्दर्शिका, स्पीकर, वेलनेस, लाइफस्टाइल आणि ट्रॅव्हलिंगमध्ये व्यवसायसुद्धा करते. 2013 मध्ये आरतीचा ‘व्याह 70 किमी’ हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तिने चित्रपटांमध्ये काम केलं नाही. मात्र इतर व्यवसायात ती सक्रिय आहे. आरतीने ‘लज्जा’ या चित्रपटातून बॉलिवूडमधील करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने ‘आवारा पागल दिवाना’, ‘तुमसे अच्छा कौन है’, ‘शादी नंबर 1’, ‘शूटआऊट ॲट लोखंडवाला’ आणि ‘पार्टनर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
आरतीने बालकलाकार म्हणूनही काही जाहिरातींमध्ये काम केलं होतं. तिने जवळपास 300 हून अधिक जाहिरातींमध्ये काम केलंय. मॅगी न्यूडल्स, पेप्सोडेंट टूथपेस्ट, क्लिन अँड क्लिअर फेस वॉश, अमूल फ्रॉस्टिक आइस्क्रीम यांसारख्या अनेक ब्रँड्ससाठी तिने जाहिराती केल्या आहेत. आरतीने 1999 मध्ये ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड’ या सौंदर्यस्पर्धेचा किताब जिंकला होता. त्यानंतर ती गायक सुखविंदर सिंगच्या ‘नशा ही नशा है’ या म्युझिक व्हिडीओमध्ये ती झळकली होती.