‘बजरंगी भाईजान’ची मुन्नी बनली ‘हिरामंडी’ची आलमजेब; नेटकरी म्हणाले ‘भन्साळींनी हिलाच निवडलं..’
हर्षालीने स्वत:चा युट्यूब चॅनलसुद्धा सुरू केला आहे. त्यावरही ती विविध व्हिडीओ पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे तीन दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येतात.
सध्या सोशल मीडियावर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी: द डायमंड बाजार’ या वेब सीरिजची जोरदार चर्चा आहे. त्यातील गाणी, वेगवेगळे सीन्स, डायलॉग्स व्हायरल होत आहेत. काहींनी अदिती राव हैदरीचा डान्स पसंत येतोय तर काहींना मनिषा कोईरालाचं अभिनय आवडतंय. अशातच ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात मुन्नीची भूमिका साकारलेली हर्षाली मल्होत्राचा एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधतंय. सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातील चिमुकली मुन्नी आता मोठी झाली आहे. सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असून इन्स्टाग्रावर विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात ती ‘हिरामंडी’मधील आलमजेब बनून परफॉर्म केलंय. तिचा हा परफॉर्मन्स नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे.
हर्षालीने ‘हिरामंडी’मधील आलमजेबसारखा लूक केला आहे. त्याच सीरिजमधील एका गाण्यावर तिने हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमधील तिचे हावभाव, अभिनय आणि अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. इतकंच काय तर काहींनी थेट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना त्यांच्या आगामी चित्रपटात हर्षालीला भूमिका देण्याचा सल्ला दिला आहे. ‘हिरामंडी’मध्ये भन्साळींची भाची शर्मिन सेहगल हिने आलमजेबची भूमिका साकारली आहे. मात्र याच भूमिकेमुळे तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. शर्मिनच्या चेहऱ्यावर काही हावभावच दिसत नाहीत, असं अनेकांनी म्हटलंय. त्याविरुद्ध हर्षालीने या गाण्याच्या व्हिडीओत सुंदर अदा दाखवल्या आहेत, असं नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. ‘आलमजेबची भूमिका तूच साकारायला पाहिजे होतीस’, असं एकाने लिहिलं. तर ‘संजय लीला भन्साळींची पुढची अभिनेत्री’, असं दुसऱ्याने म्हटलंय. याआधीची हर्षालीने विविध गाण्यांवर व्हिडीओ शूट करून पोस्ट केले आहेत.
View this post on Instagram
‘बजरंगी भाईजान’मध्ये मुन्नीची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारी हर्षाली मल्होत्री आता 16 वर्षांची झाली आहे. सोशल मीडियावर ती सक्रिय असून तिचे इन्स्टाग्रामवर दोन दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हर्षाली मल्होत्राला ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा स्क्रीन अवॉर्ड आणि भारतरत्न डॉ. आंबेडकर अवॉर्ड मिळाला. या चित्रपटाशिवाय तिने ‘कुबुल है’ आणि ‘लौट आओ त्रिशा’ यांसारख्या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.