‘भाभीजी घर पर है’च्या अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा; क्रिकेट अकॅडमीमध्ये लैंगिक शोषण
'भाभीजी घर पर है' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सानंद वर्माने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला. वयाच्या 13 वर्षी क्रिकेट अकॅडमीमध्ये एकाने लैंगिक शोषण केल्याचं त्याने सांगितलं.
‘भाभीजी घर पर है’ या मालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. या मालिकेत अनोखे लाल सक्सेनाची भूमिका साकारून सर्वांना हसवणारा अभिनेता सानंद वर्माने त्याच्या खासगी आयुष्यात बरेच दु:ख सहन केले आहेत. सानंदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेचा खुलासा केला. वयाच्या 13 व्या वर्षी लैंगिक शोषणाचा शिकार झाल्याचं त्याने सांगितलं. लहानपणी घडलेल्या त्या घटनेचा मनावर खोलवर परिणाम झाल्याचं सानंद म्हणाला.
‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत सानंद म्हणाला, “क्रिकेट मॅचदरम्यान माझ्यासोबत अशी घटना घडली होती. त्यावेळी मी 13 वर्षांचा होतो. मला क्रिकेट खेळायची खूप आवड होती. बिहारमधल्या पाटणा याठिकाणी असलेल्या क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमीत मी शिकण्यासाठी गेलो होतो. तिथे एका पुरुषाने माझं लैंगिक शोषण केलं होतं. मी त्यावेळी खूप घाबरलो होतो आणि तिथून पळालो. तेव्हापासून मी क्रिकेटपासून लांबच राहिलो.”
या घटनेचा मनावर खोलवर परिणाम झाल्याचं त्याने सांगितलं. त्याचसोबत त्यानंतर मानसिकदृष्ट्या अधिक कणखर झाल्याचं तो म्हणाला. “माझ्यासोबत लहानपणी जे घडलं, ती नक्कीच भयानक आठवण आहे. याआधीही माझ्यासोबत अनेक भयानक गोष्टी घडल्या आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती एवढ्या सगळ्या गोष्टी सहन करते, तेव्हा दुसऱ्या कोणत्याच वेदनांनी काही फरक पडत नाही”, अशा शब्दांत सानंद व्यक्त झाला.
View this post on Instagram
या मुलाखतीत सानंद इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाला. “या इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच होतो. याबद्दल काही दुमत नाही. पण सुदैवाने माझ्यासोबत आतापर्यंत असं काही घडलं नाही. त्या अर्थाने कोणी मला अद्याप अप्रोच केलं नाही. पण माझ्या बऱ्याच सहकलाकारांना असे अनुभव आले आहेत. त्यांनी त्यांचे वेदनादायी अनुभव मला सांगितले आहेत, जे घडायला पाहिजे नव्हते”, असं सानंद म्हणाला.
सानंद गेल्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करतोय. त्याने सीआयडी, लापतागंज आणि गुपचूप यांच्यासारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय रेड, मर्दानी, बबली बाऊन्सर, छिछोरे आणि मिशन रानीगंज या चित्रपटांमध्येही त्याने काम केलंय.