Bhairavi Vaidya | सलमान-ऐश्वर्यासोबत काम केलेल्या अभिनेत्रीचं निधन; ‘या’ गंभीर आजाराने होती ग्रस्त
त्यांनी इतरही भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलंय. 'व्हेंटिलेटर' या गुजराती चित्रपटात त्या झळकल्या होत्या. यामध्ये जॅकी श्रॉफ आणि प्रतीक गांधी यांच्या मुख्य भूमिका होत्या. व्हॉट्स युअर राशी, हमराज, क्या दिल ने कहाँ या चित्रपटांमध्येही त्या विविध भूमिकेत होत्या.
मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचं निधन झालं. त्यांनी सलमान खानसोबत ‘चोरी चोरी चुपके चुपके’ आणि ऐश्वर्या रायसोबत ‘ताल’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. 8 ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भैरवी 67 वर्षांच्या होत्या. त्यांची मुलगा जानकी वैद्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित आईच्या निधनाविषयीची माहिती दिली. भैरवी गेल्या 45 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत काम करत होत्या. सलमान आणि ऐश्वर्यासोबतच त्यांनी इतरही मोठमोठ्या कलाकारांसोबत भूमिका साकारल्या आहेत. भैरवी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मुलीची भावनिक पोस्ट-
‘माझ्यासाठी तू माझी मा, मॉम, मम्मी, छोटी, भैरवी हे सर्वकाही होतीस. निर्भिड, कल्पक, सतत इतरांची काळजी करणारी, जबाबदार आणि आयुष्य भरभरून जगणारी व्यक्ती. सर्वांत आधी तू एक अभिनेत्री, त्यानंतर पत्नी आणि आई होतीस. एक अशी महिला, जी तिच्या मुलांना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवून गेली. तर मग काय.. याचा विचार न करता आम्ही पुढे चालायला शिकलो. थोडीही तडजोड न करता चित्रपट, टीव्ही आणि ओटीटीवर तू आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीस. एक अशी महिला, जी तिच्या कुटुंबीयांसोबत भरभरून हसली आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढली. तुला माझा प्रणाम. या आयुष्यात मला तू आई म्हणून मिळाल्याने मी स्वत:ला नशीबवान समजते. तुझ्या आत्म्याला शांती मिळो’, अशा शब्दांत जानकीने भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
भैरवी यांनी गेल्या 45 वर्षांच्या कारकिर्दीत चित्रपट आणि टीव्हीवर बऱ्याच भूमिका साकारून आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा पहिला चित्रपट अनिल कपूर आणि ऐश्वर्या रायसोबतचा ‘ताल’ होता. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्यांनी जानकीची भूमिका साकारली होती. त्यानंतर 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खान, प्रिती झिंटा आणि राणी मुखर्जी यांच्या ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटात त्यांनी सहाय्यक भूमिका साकारली.