बिग बॉसच्या सोळाव्या सिझनची (Bigg Boss 16) धमाकेदार सुरुवात झाली आहे. यंदाचा सिझन हा मागच्या सिझन्सपेक्षा बराच वेगळा आणि अनोखा आहे. बिग बॉस या शोच्या इतिहासात पहिल्यांदाच या सिझनमध्ये प्रेक्षकांना अशा काही गोष्टी पहायला मिळाल्या आहेत, ज्याची कधी कल्पनाही केली नसावी. नव्या शोमध्ये बिग बॉसचा (Bigg Boss) अंदाज पूर्णपणे बदलला आहे. अगदी पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांच्या प्रत्येक गोष्टीवर बिग बॉस बारकाईने लक्ष देत आहे. यंदाचा सिझनमध्ये स्पर्धकांना कठोर वागणूक दिली जाणार आहे. हेच पहिल्या एपिसोडमध्ये पहायला मिळालं.
स्पर्धकांच्या हलगर्जीपणाला, छोट्यातल्या छोट्या चुकीला आता बिग बॉसकडून माफी मिळणार नाही. या नव्या सिझनची पहिली नॉमिनेशन प्रक्रिया पार पडणार आहे. त्याचाच प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
इतर स्पर्धकांना नॉमिनेट केल्यानंतर टीना दत्ता, सौंदर्या शर्मा आणि मान्या सिंह त्यांना ‘सॉरी’ म्हणतात. नॉमिनेशन प्रक्रियेत सॉरी बोलणं बिग बॉसला अजिबात आवडलं नाही. “या घरात काही महान लोक आहेत, ज्यांना मी सॉरी म्हणताना ऐकलंय. बिग बॉसकडून या तिघांना सॉरी म्हटल्याबद्दल शिक्षा दिली जातेय. बिग बॉसच्या पुढच्या आदेशापर्यंत या तिघांना घरातील सर्व कामं करावी लागणार आहेत”, असं बिग बॉसकडून सांगण्यात आलं.
शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये बिग बॉने कॅप्टन्सीवरून स्पर्धकांना झटका दिला. यंदा घरातील कॅप्टनवर स्वत: बिग बॉसची 24 तास नजर असणार आहे. जर कॅप्टन त्याची ड्युटी बजावण्यात चुकला तर घरात एक रिंग वाजवली जाई आणि त्याला कॅप्टन्सी पदावरून हटवलं जाईल. हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. त्यामुळे यंदा कॅप्टनलाही आराम करता येणार नाही.
बिग बॉस 16 मध्ये स्पर्धकांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. या शोच्या प्रत्येक सिझनमध्ये स्पर्धक नियम मोडताना, हट्टीपणा करताना दिसले. मात्र यावेळी स्पर्धकांचा मनमानी कारभार चालणार नाही, हे बिग बॉसने पहिल्याच एपिसोडमध्ये स्पष्ट केलंय.