Archana Gautam | प्रियंका गांधी यांच्या पीएवर ‘बिग बॉस 16’ फेम अर्चना गौतमचा गंभीर आरोप; म्हणाली..
अर्चनाने बिग बॉसच्या सोळाव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. मात्र तिच्या वागणुकीमुळे आणि घरातील हिंसक वृत्तीमुळे तिला सातव्या आठवड्यात सलमान खानने शोमधून काढून टाकलं होतं. शिव ठाकरेनं प्रियांका गांधी यांच्याविषयी वक्तव्य केलं होतं.
मुंबई : ‘बिग बॉस 16’ या रिॲलिटी शोमधून घराघरात पोहोचलेल्या अर्चना गौतमने सोमवारी प्रियांका गांधी यांच्या जवळच्या सहकारीवर गंभीर आरोप केले. अर्चनाने फेसबुकवर लाइव्ह येत संदीप सिंह यांच्यावर आरोप केले. “ते मला दो कौडी की.. असं म्हणाले”, असं अर्चनाने सांगितलं. इतकंच नव्हे तर रायपूर सेशनदरम्यान संदीप यांनी तिला धमकी दिली आणि तुरुंगात डांबण्याचा इशारा दिला, असंही अर्चना म्हणाली. प्रियांका गांधी यांच्या पीएला महिलांशी कसं बोलावं, हा शिष्टाचार माहीत नाही. संपूर्ण काँग्रेस पक्ष संदीप सिंह यांच्यावर नाराज आहे, असं अर्चनाने सांगितलं.
“अशी माणसं पार्टीमध्ये का ठेवली जातात, जे पार्टीलाच कुरतडून खातात. ते कोणालाही प्रियांका गांधी यांच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. त्यांच्यापासून सर्वकाही गुप्त ठेवलं जातं. मला स्वत:ला त्यांना भेटायला जवळपास वर्षभराचा अवधी लागला”, अशी टीका अर्चनाने केली.
अर्चना पुढे म्हणाली, “मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला नव्हता. पण मी प्रियांका दीदीसोबत जोडले गेले होते. त्यांच्यामुळेच मी काँग्रेसपर्यंत आले होते. संदीप सिंहने मला ‘दो कौडी की’ असं म्हटलं आणि फार काही बोलले तर तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मला तुरुंगात टाकून दाखवावं.”
View this post on Instagram
अर्चनाने बिग बॉसच्या सोळाव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. मात्र तिच्या वागणुकीमुळे आणि घरातील हिंसक वृत्तीमुळे तिला सातव्या आठवड्यात सलमान खानने शोमधून काढून टाकलं होतं. शिव ठाकरेनं प्रियांका गांधी यांच्याविषयी वक्तव्य केलं होतं. त्यामुळे चिडून तिने शिवला मारहाण केली होती. त्यांच्याविरोधात काहीच ऐकून घेणार नाही, असं तिने स्पष्ट केलं होतं. मात्र त्यानंतर दोन दिवसांतच तिला पुन्हा बिग बॉसच्या घरात आणलं गेलं.
अर्चनावरून सोशल मीडियावर दोन गट तयार झाले होते. एका गटाने तिचं समर्थन केलं आणि शिववर टीका केली. तर दुसऱ्या गटाने तिच्या हिंसक वागणुकीवरून जोरदार टीका केली.
कोण आहे अर्चना गौतम?
उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये राहणाऱ्या अर्चनाचा जन्म 1 सप्टेंबर 1995 रोजी झाला. अर्चना एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असून तिच्या वडिलांचं नाव गौतम बुद्ध आहे. अर्चनाचे वडील राजकारण सक्रिय असल्याचं कळतंय. तर तिची आई गृहिणी आहे. आपल्या वडिलांप्रमाणेच अर्चनालाही राजकारणात नाव कमवायचं आहे. ती निवडणूकसुद्धा लढली आहे. मात्र निवडणुकीत अर्चनाला यश मिळालं नाही.