Bigg Boss 16 Revenue: सलमानच्या ‘बिग बॉस 16’ची जोरदार कमाई सुरू; मोडले अनेक विक्रम
बिग बॉसचा खेळ पैशांचा; यंदाच्या सिझनमधून होतेय तब्बल इतक्या कोटींची कमाई
मुंबई: बिग बॉसचं 16 सिझन सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. या शोमध्ये दररोज नवनवीन ट्विस्ट पहायला मिळत आहेत. नुकतंच या शोमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली. गेल्या 12 वर्षांपासून अभिनेता सलमान खान या शोचं सूत्रसंचालन करतोय. सलमान खानमुळेच अनेकजण हा शो पाहतात. बिग बॉसच्या शोद्वारे वाहिनीची चांगली कमाई होते. ब्रँड, स्पॉन्सरशिप, चित्रपटांचं प्रमोशन, जाहिराती या विविध माध्यमांतून शोसाठी भरपूर पैसे मिळतात. आता बिग बॉसच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. हे आकडे पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस ओटीटीने गेल्या वर्षी 120 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर जाहिरातींमधून 150 रुपये कमावले होते. जसजशी या शोची लोकप्रियता वाढतेय, तसतशी त्याच्या कमाईत वाढ होताना दिसते. या सिझनसाठीची कमाई 180 ते 200 कोटी रुपये होणार असल्याचं म्हटलं जातंय.
बिग बॉसच्या या सिझनमध्ये टीव्ही आणि ओटीटीवरील प्रेक्षकांच्या संख्येत 41 आणि 40 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. हा शो वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर पाहिला जातो. या आकड्यांवरून अंदाज लागतो की या शोची लोकप्रियता किती आहे? यंदाचा सिझनसुद्धा प्रेक्षकांमध्ये हिट ठरतोय. या शोसाठी सलमान खानची ब्रँड व्हॅल्यू सर्वाधिक आहे. त्याच्यासाठी मोठमोठे ब्रँड्स जाहिरातीसाठी पुढे येतात.
यंदाच्या सिझनमध्ये शालीन भनोट, सुंबुल तौकीर खान आणि टिना दत्ता यांच्यातील लव्ह-ट्रँगल चर्चेचा विषय ठरला आहे. तर अब्दुचीही प्रेक्षकांमध्ये भरपूर लोकप्रियता आहे. अर्चना गौतम आणि साजिद खान या दोन स्पर्धकांमुळेही बिग बॉसचा शो सतत चर्चेत असतो.