मुंबई: आजपासून (6 फेब्रुवारी) बिग बॉस 16 च्या फिनाले वीकची सुरुवात झाली आहे. येत्या 12 फेब्रुवारी रोजी या सिझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. बिग बॉसची ट्रॉफी मिळवण्यासाठी पाच स्पर्धकांमध्ये चुरस रंगली आहे. आजच्याच एपिसोडमध्ये टॉप 5 स्पर्धकांच्या नावावरून पडदा उचलण्यात येणार आहे. बिग बॉसचा यंदावा सिझनसुद्धा ब्लॉकबस्टर राहिला. टीआरपीमध्ये या शोने बाजी मारली. लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी फेब्रुवारीपर्यंत हा शो वाढवला. आता हा शो अंतिम टप्प्यात पोहोचला असताना चाहत्यांना विजेत्याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
बिग बॉसच्या घरातून निमृत कौर आहलुवालिया बाहेर पडल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. मात्र याची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही. मात्र निमृत गेल्यानंतर घरात शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, एमसी स्टॅन, अर्चना गौतम आणि शालीन भनोट हे पाच स्पर्धक राहणार आहेत.
बिग बॉस 16 च्या ट्रॉफीची पहिली झलकसुद्धा दाखवण्यात आली आहे. 6 फेब्रुवारीच्या प्रोमोमध्ये बिग बॉसची ट्रॉफी दाखवण्यात आली आहे. यंदाच्या सिझनची ट्रॉफी ही आतापर्यंतच्या सर्व सिझनपेक्षा अत्यंत वेगळी आणि खास आहे. या ट्रॉफीमध्ये युनिकॉर्न बनवण्यात आला आहे आणि तो सिल्वर-गोल्ड कलरमध्ये पहायला मिळतोय. बिग बॉस 16 च्या ट्रॉफीची डिझाइन Feminine असल्याने महिला हा शो जिंकणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश ठरली होती. त्या सिझनच्या ट्रॉफीमध्ये फुलपाखरूच्या पंखाची डिझाइन होती. बिग बॉस 16 साठी सध्या सोशल मीडियावर प्रियांका चहर चौधरीच्या नावाचीच चर्चा आहे.
यंदाच्या सिझनच्या विजेत्याला 50 लाख रुपये बक्षिसाची रक्कम मिळणार होती. मात्र स्पर्धकांनी टास्कदरम्यान अर्धी रक्कम गमावली. त्यानंतर बक्षिसाची रक्कम 21 लाख 80 हजार रुपये करण्यात आली. बिग बॉसने अनेकदा स्पर्धकांना गमावलेली बक्षिसाची रक्कम परत मिळवण्याची संधी दिली, मात्र त्यात स्पर्धत अपयशी ठरले.
ग्रँड फिनालेमध्ये मनी बॅग टास्कसुद्धा प्रेक्षकांचं लक्ष वेधणार आहे. बॅगमध्ये 10 ते 20 लाख रुपये ठेवण्यात येणार आहेत. ही बॅग उचलून कोण फिनालेच्या शर्यतीतून बाहेर पडणार हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
बिग बॉस 16 चा विजेता कोण ठरणार, याचा निर्णय ग्रँड फिनालेच्या दिवशी लाइव्ह वोटिंगने होणार आहे. दरवेळी निर्माते फिनालेदरम्यान टॉप 2 स्पर्धकांसाठी काही वेळ लाइव्ह वोटिंग लाइन्स खुले ठेवतात. प्रेक्षकांना वूट ॲपद्वारे किंवा वेबसाइटवर जाऊन हे वोटिंग करता येणार आहे. टॉप 3 स्पर्धकांची घोषणा होताच ही वोटिंग खुली केली जाणार आहे.