हे कसले अँगल्स, कुठे झूम करताय? पापाराझींवर भडकली ‘बिग बॉस 17’ फेम अभिनेत्री
पलक तिवारीने पापाराझींना विनंती केली की त्यांनी मागून तिचे कोणते फोटो किंवा व्हिडीओ क्लिक करू नयेत. मात्र तरीसुद्धा ती पलटल्यानंतर काहींनी तिचा पाठलाग केला आणि फोटो क्लिक केले. त्याचा व्हिडीओसुद्धा काही पापाराझींनी सोशल मीडियावर अपलोड केला. याआधी आलिया भट्ट, अनुष्का शर्मा यांनीसुद्धा पापाराझींना फटकारलं होतं.
गेल्या काही वर्षांत इंडस्ट्रीत ‘पापाराझी कल्चर’ मोठ्या प्रमाणावर वाढलंय. सेलिब्रिटी कुठेही गेले तरी त्यांच्या मागे हे पापाराझी असतातच. सोशल मीडियावर आपण अभिनेत्रींचे असे अनेक व्हिडीओ पाहतो, ज्यामध्ये जाणूनबुजून त्यांना झूम-इन करून चुकीच्या पद्धतीने दाखवलं जातं. अशाच पापाराझी अकाऊंट्स आणि फोटोग्राफर्सची चांगलीच शाळा ‘बिग बॉस 17’ फेम आयेशा खानने घेतली आहे. आयेशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने फोटोग्राफर्सच्या वागण्याचा तिरस्कार केला आहे. हे फोटोग्राफर्स सेलिब्रिटींना ठराविक अँगलने पोझ द्यायला सांगतात आणि त्यानंतर सोशल मीडियावर तो झूम-इन करून चुकीच्या पद्धतीने दाखवतात, अशी तक्रार तिने केली आहे.
आयेशा खानची पोस्ट-
‘हे कसे अँगल्स आहेत? तुम्ही कुठे झूम-इन करत आहात? हे करण्याची तुम्हाला परवानगी आहे का? काही माध्यमांना नेमकं काय झालंय? कोण, कुठून आणि कोणत्या अँगलने आपला फोटो किंवा व्हिडीओ काढेल याची भीती न बाळगता एखादी महिला तिच्या इच्छेनुसार कपडे घालू शकत नाही का? हे खरंच तिरस्कार करण्यासारखं आहे’, अशा शब्दांत तिने पापाराझींना सवाल केला.
पापाराझी आणि फोटोग्राफर्सना शिष्टाचार शिकण्याची गरज असल्याचं सांगत तिने पुढे लिहिलं, ‘कारमधून बाहेर पडताना एक महिला तिचा ड्रेस सावरतेय आणि तुम्हाला नेमका तोच क्षण कॅमेरात कैद करून पोस्ट करायचा असतो. ती तुम्हाला विनंती करतेय की मागून फोटो किंवा व्हिडीओ काढू नका. तरीसुद्धा तुम्ही त्यावरून कॅप्शन टाकून व्हिडीओ पोस्ट करता की, अमूक एक अभिनेत्री म्हणाली, मागून फोटो किंवा व्हिडीओ काढू नका. काही मीडिया हाऊसला सामान्य शिष्टाचारसुद्धा शिकण्याची गरज आहे.’
याआधी दिलेल्या एका मुलाखतीतसुद्धा आयेशाने ‘पापाराझी कल्चर’वरून सुनावलं होतं. “ते तुमच्या शरीराच्या ठराविक भागांना झूम-इन करून दाखवतात, तुमचा पाठलाग करतात, जरा कुठे ‘उप्स मूमेंट’ झाली किंवा वॉर्डरोब मालफंक्शन झालं की लगेच ते कॅमऱ्यात कैद करायला तयार असतात. सेलिब्रिटी हे पब्लिक फिगर असतात म्हणून तुम्ही परवानगीशिवाय त्यांचे फोटो, व्हिडीओ काढता हे मान्य आहे. पण चुकीच्या अँगलने ते व्हिडीओ झूम-इन करणं वाईट आहे”, अशा शब्दांत तिने नाराजी व्यक्त केली होती.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मृणाल ठाकूरसोबत असाच एक किस्सा घडला होता. एका कार्यक्रमात जेव्हा ती रेड कार्पेटवर येऊन पापाराझी आणि फोटोग्राफर्ससमोर फोटोसाठी पोझ देतो होती. तेव्हा एकाने तिला मागे वळून पोझ देण्यास सांगितलं. त्यावर तिने अत्यंत नम्रतेने त्याला नकार दिला आणि म्हणाली, “मला आवडो किंवा न आवडो, तुमचा कॅमेरा पोहोचतोच.” या घटनेच्या काही दिवसांनंतर अभिनेत्री पलक तिवारीनेही फोटोग्राफर्सना अशाच प्रकारे विनंती केली होती.