‘बिग बॉस 17’मधील हा स्पर्धक संपूर्ण सिझनसाठी नॉमिनेट, तर दुसरा संपूर्ण सिझनसाठी सुरक्षित
बिग बॉसच्या सतराव्या सिझनमध्ये मोठा ट्विस्ट पहायला मिळणार आहे. संपूर्ण सिझनसाठी एका स्पर्धकाला नॉमिनेट करण्यात आलं असून बिग बॉसचा हा निर्णय चुकीचा असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. बिग बॉस पक्षपात करत असल्याचीही तक्रार प्रेक्षकांनी केली आहे.
मुंबई : 6 डिसेंबर 2023 | ‘बिग बॉस’ हा टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो आहे. सध्या बिग बॉस हिंदीचा 17 वा सिझन सुरू आहे आणि हा सिझन पहिल्याच एपिसोडपासून चर्चेत आहे. मात्र यंदाच्या सिझनमध्ये काही स्पर्धकांसोबत पक्षपात केला जात असल्याचाही आरोप प्रेक्षकांकडून होत आहे. या संपूर्ण सिझनसाठी अनुराग डोभालच्या डोक्यावरून नॉमिनेशनची टांगती तलवार हटवली गेली आहे. तर दुसरीकडे ऐश्वर्या शर्मा पती आणि टीव्ही अभिनेता नील भट्टला संपूर्ण सिझनसाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. बिग बॉसच्या घरात आलेल्या मोठ्या ट्विस्टमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. दुसरीकडे बिग बॉसच्या घरातील एक स्पर्धक संपूर्ण सिझनसाठी नॉमिनेशनपासून वाचला आहे. हा फक्त इतर स्पर्धकांसाठीच नाही तर बिग बॉसच्या चाहत्यांसाठीही मोठा झटका होता. सोशल मीडियावर या निर्णयावरून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अंकिता लोखंडेचा पती विकी जैन या संपूर्ण सिझनमधील नॉमिनेशनपासून सुरक्षित झाला आहे. कारण स्पर्धकांनी नील भट्टच्या जागी त्याला संपूर्ण सिझनसाठी नॉमिनेट करण्याच्या ऑफरला स्वीकारलं नव्हतं. ‘द खबरी’ने याविषयीचं वृत्त एक्सवर (ट्विटर) दिलं असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘हा स्पष्ट पक्षपात आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘यंदाच्या बिग बॉसच्या सिझनला बॉयकॉट करा’, अशी मागणी दुसऱ्या युजरने केली आहे. खरंतर अनुराग डोभाल हा गेल्या काही आठवड्यांपासून त्याच्या वागणुकीमुळे संपूर्ण सिझनसाठी नॉमिनेट झाला होता. मात्र विकी जैन, तहलका, अरुण माशेट्टी आणि सना रईस खान यांच्या एका निर्णयामुळे तो वाचला. मात्र त्याच्या जागी आता नील भट्ट संपूर्ण सिझनसाठी नॉमिनेट झाला आहे.
#BiggBoss17 #BB17 #VickyJain is safe from whole season nomination, as contestants rejected the offer of nominating him for whole season over #NeilBhatt
— The Khabri (@TheKhabriTweets) December 5, 2023
अंकितासोबत विकीचं वागणं योग्य नसल्याची तक्रार प्रेक्षकांनी केली होती. शोच्या सुरुवातीपासूनच बिग बॉस अंकिता आणि विकीला खास वागणूक देत असल्याचंही काहींनी म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर बिग बॉसच्या घरात त्यांना इतरांपेक्षा विशेष सुविधा मिळत असल्याचीही तक्रार काही स्पर्धकांनी केली होती. आता नील भट्टला संपूर्ण सिझनसाठी नॉमिनेट केल्यानंतर बिग बॉस घरातील स्पर्धकांना त्याला सुरक्षित करण्याची दुसरी संधी देणार की नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.