Bigg Boss 17 मधील स्पर्धकाने ऑनस्क्रीन भावाशीच केलं लग्न; 15 वर्षांनंतर पतीपासून विभक्त
रिंकूने 2015 मध्ये 'ये वादा रहा' या मालिकेतील भूमिकेसाठी टक्कलसुद्धा केलं होतं. 2000 मध्ये 'कहानी घर घर की' या मालिकेशिवाय तिने 2012 मध्ये 'ना बोले तुम ना मैंने कुछ कहाँ', 2020 मध्ये 'गुप्ता ब्रदर्स' आणि यावर्षी 'तितली'सारख्या मालिकांमध्ये काम केलं.
मुंबई : 28 ऑक्टोबर 2023 | ‘कहानी घर घर की’ ही एकेकाळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका होती. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. त्यातलीच एक कलाकार सध्या सलमान खानच्या ‘बिग बॉस 17’ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. रिंकू धवन असं या अभिनेत्रीचं नाव आहे. रिंकू तिच्या विविध भूमिकांमुळे आणि त्यासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळे नेहमीच चर्चेत राहिली. एका भूमिकेसाठी तिने टक्कलसुद्धा केलं होतं. रिंकूने तिच्या आतापर्यंतच्या 25 वर्षांच्या करिअरमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.
ऑनस्क्रीन भावाशी केलं लग्न
रिंकू तिच्या अभिनयासोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कहानी घर घर की’मध्ये अभिनेता किरण करमरकरने रिंकूच्या भावाची भूमिका साकारली होती. याच मालिकेत काम करता करता रिंकू आणि किरण एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर 2002 मध्ये दोघांनी लग्न केलं. मात्र लग्नाच्या 15 वर्षांनंतर रिंकू आणि किरणने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांना एक मुलगा असून त्याचं नाव ईशान आहे.
View this post on Instagram
2019 मध्ये रिंकूने किरणला घटस्फोट दिला. त्यापूर्वी काही वर्षांपासून दोघं वेगवेगळे राहत होते. एका मुलाखतीत रिंकू म्हणाली, “कोणालाच एकटं राहायला आवडत नाही. माझे मित्रमैत्रिणी मला पुन्हा लग्न करण्याचा सल्ला देतात. पण त्यासाठी योग्य व्यक्ती सापडणं खूप महत्त्वाचं असतं. मी घटस्फोटाचा माझ्या आयुष्यावर फारसा परिणाम होऊ दिला नाही. ही फार वर्षांपूर्वींची गोष्ट आहे आणि मी त्यातून कधीच पुढे निघून आले.”
‘सपना बाबुल का.. बिदाई’, ‘लेडीज स्पेशन’ आणि ‘नजर’ या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री आशिता धवन ही रिंकूची चुलत बहीण आहे. रिंकूने 1995 मध्ये ‘स्वाभिमान’ या मालिकेतून करिअरची सुरुवात केली. तिने दूरदर्शनच्या शोमध्ये नीतू मल्होत्राची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘हम पाँच’ या लोकप्रिय मालिकेत ती फूलनच्या भूमिकेत होती. तिने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही भूमिक साकारल्या आहेत. 2017 मध्ये ‘हम दिवाना दिल’ आणि 2019 मध्ये ‘वीरगती’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली.