मुंबई : 16 जानेवारी 2024 | सलमान खानचा ‘बिग बॉस 17’ हा शो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या महिन्यात कलर्स टीव्हीवर या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. आणखी दोन आठवड्यांत ‘बिग बॉस 17’ या शोच्या विजेत्याचं नाव घोषित होणार आहे. या शोमध्ये दररोज नवीन ड्रामा पहायला मिळतोय. ट्रॉफी मिळवण्यासाठी स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. सध्याच्या घडीला मुनव्वर फारुखी, अभिषेक कुमार आणि अंकिता लोखंडे हे तिघे तगडे स्पर्धक मानले जात आहेत. प्रेक्षकसुद्धा यंदाच्या सिझनच्या विजेत्याचं नाव जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. ‘वीकेंड का वार’ या एपिसोडचं सूत्रसंचालन करण जोहरने केलं. यावेळी त्याने विकी जैनची शाळा घेतली. त्यासोबतच त्याने विजेत्यासाठीची एक खुशखबर सांगितली.
‘बिग बॉस 17’च्या विजेत्याला ट्रॉफी आणि जिंकलेल्या रकमेसोबतच आणखी एक खास भेटवस्तू मिळणार आहे. याबद्दलची माहिती खुद्द करणने दिली. वीकेंड का वार एपिसोडमध्ये त्याने एका कारच्या ब्रँडचे सीईओ तरुण गर्ग यांचं स्वागत केलं. त्यांनी स्पर्धकांचीही भेट घेतली. तरुण गर्ग यांनी शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणला त्यांच्या कारचे ब्रँड अॅम्बेसिडर असल्याचं सांगत हुंडाई क्रेटाच्या लाँचची घोषणा केली. यासोबतच त्यांनी असंही सांगितलं की शोच्या विजेत्याला आलिशान कारसुद्धा भेट म्हणून मिळणार आहे. ‘बिग बॉस 17’च्या विजेत्याला 50 लाख रुपयेसुद्धा मिळणार आहेत. मात्र ही रक्कम ग्रँड फिनालेपर्यंत तेवढीच राहणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. काही स्पर्धकांमुळे ही रक्कम कमी करण्यात आली होती. ‘बिग बॉस 17’मध्ये एकूण 17 स्पर्धकांची एण्ट्री झाली होती.
आधी ‘बिग बॉस 17’चा ग्रँड फिनाले हा 15 आठवड्यांनंतर 28 जानेवारी 2024 रोजी होणार होता. मात्र आता ‘बिग बॉस 17’चा विजेता एक दिवसानंतर म्हणजेच 29 जानेवारी 2014 रोजी घोषित केला जाणार आहे. ‘बिग बॉस 17’ संपल्यानंतर कलर्स टीव्हीवर डान्स शो ‘डान्स दिवाने’ सुरू होणार आहे. या शोचा ग्रँड प्रीमिअर 3 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडणार आहे.